कार विक्रीत 'या' 3 कंपन्यांसमोर सगळेच 'फेल'! धडाक्यात होतेय विक्री, शोरूमवर लाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 10:15 IST2023-03-02T10:11:53+5:302023-03-02T10:15:19+5:30
जाणून घ्या फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक कार विकणाऱ्या 5 कंपन्यांसंदर्भात...

मागणी वाढल्याने फेब्रुवारी महिन्यात पॅसेन्जर गाड्यांची ठोक विक्रीत 3.35 लाखांच्याही पुढे गेली आहे. जवळपास सर्वच प्रमुख वाहन निर्मात्यांनी वार्षिक आधारावर विक्रीत वृद्धी नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत, गेल्या महिन्यात वाहनांची एकूण विक्री 11 टक्क्यांनी वाढून 3.35 लाख युनिट्सच्याही पुढे गेली आहे. फेब्रुवारी महिन्यातील वाहनांच्या ठोक विक्रीचा हा विक्रमी आकडा आहे. तर जाणून घेऊयात फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक कार विकणाऱ्या 5 कंपन्यांसंदर्भात...

Maruti Suzuki- 1,55,114 युनिट्स - देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाची (MSI) देशांतर्गत बाजारातील ठोक विक्री तब्बल 11 टक्क्यांनी वाढली आहे. मारुतीने तब्बल 1,55,114 युनिट्सची विक्री केली आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 1,40,035 युनिट्स एवढा होता. पण फेब्रुवारी 2023 मध्ये कंपनीची निर्यात 28 टक्क्यांनी कमी होऊन 17,207 वर आली आहे. एक वर्षापूर्वी हा आकडा 24,021 युनिट्स एवढा होता.

2. Hyundai- 47,001 युनिट्स - ह्युंदाई मोटर इंडियाची देशांतर्गत बाजारातील विक्री 7 टक्क्यांनी वाढून 47,001 युनिट्स झाली आहे. फेब्रुवारी, 2022 मध्ये हा आकडा 44,050 युनिट्स एवढा होता. कंपनीने म्हटल्यानुसार, 2023 मध्ये त्यांनी भारतातून 10,850 वाहनांची निर्यातही केली आहे. हा आकडा एकवर्षापूर्वीच्या 9,109 वाहनांच्या तुलनेत 19 टक्क्यांनी अधिक आहे.

3. Tata Motors- 43,140 युनिट्स - देशांतर्गत वहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने म्हटल्याप्रमाणे, फेब्रुवारी महिन्यातील त्यांची देशांतर्गत बाजाराती प्रवासी वाहन विक्री (इलेक्ट्रिक वाहनांसह) 43,140 युनिट्स एवढी होती. एका वर्षापूर्वी हा आकडा 40,181 युनिट्स एवढा होता.

4. Mahindra and Mahindra- 30,358 युनिट्स - महिंद्रा अँड महिंद्राने फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 30,358 वाहनांचा पुरवठा केला. हा आकडा गेल्या वर्षीच्या 27,663 युनिट्सच्या तुलनेत 10 टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचे ऑटोमोटिव्ह सेग्मेंटचे प्रमुख विजय नाकरा यांनी म्हटले आहे की, कंपनीच्या विक्रीत SUV चा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. नुकत्याच सादर झालेल्या Thar RWD आणि XUV400 लाही ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

5. Kia India- 24,600 युनिट्स - किआ इंडियाची देशांतर्गत बाजारातील विक्री वार्षिक आधारावर 36 टक्क्यांनी वाढून 24,600 युनिट्सवर पोहोचली आहे. कंपनीचे विक्री आणि विपणन विभागाचे प्रमुख हरदीप सिंग बरार यांनी म्हटले आहे की, उद्योग जगतातील 10 टक्क्यांच्या वाढीत किआचे 35.8 टक्के वृद्धी दर नोंदवणे ग्राहकांचा विश्वास दर्शवते.

















