भ्रमाचा भोपळा...! ईव्ही पेट्रोल-डिझेल वाहनांपेक्षा कमी प्रदूषण करतात? 'गैरसमज' दूर करणारा अहवाल वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:38 IST2025-01-29T15:59:08+5:302025-01-29T16:38:20+5:30
EV car Pollution more than ICE: ईव्ही ही इंधनाच्या वाहनांपेक्षा पर्यावरणाला सर्वाधिक घातक आहे. परंतू, ती धूर सोडत नाही हाच काय तो तिचा फायदा आहे.

जगाने प्रदूषण रोखण्यासाठी महागड्या ईलेक्ट्रीक गाड्या वापरण्यास सुरुवात केली आहे. परंतू, याच ईलेक्ट्रीक गाड्या पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांपेक्षा जास्त प्रदूषण करत असल्याचे समोर आले आहे. हा अहवाल धक्कादायक असला तरी आकडे पाहिल्यास खरा आहे. यामुळे पर्यावरणाला फायद्याच्या म्हटल्या जाणाऱ्या या ईलेक्ट्रीक गाड्या किती तोट्याच्या आहेत, हे समोर येत आहे.
एक ईलेक्ट्रीक गाडी बनविण्यासाठी जेवढा कार्बन तयार होतो, त्याच्या कितीतरी कमी प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल गाड्या बनविण्यासाठी कार्बन तयार होतो. अहवालानुसार ईव्ही पासून तयार होणारा एकूण कार्बन उत्सर्जनाच्या ४६ टक्के हिस्सा हा ती बनविण्यापासून तयार होतो. पेट्रोल, डिझेल कारसाठी हाच भाग २६ टक्के एवढा आहे.
एक इलेक्ट्रीक कार बनविण्यासाठीच्या प्रक्रियेदरम्यान जवळपास ५ - १० टन कार्बन डाय ऑक्साईड निर्माण होतो. तर पेट्रोल, डिझेलसाठी यापेक्षा कमी कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो.
सर्व गाड्या या एकसारख्याच सुट्या भागांपासून बनविल्या जातात. यात फक्त बदल असतो तो इंधनाचा. ईलेक्ट्रीक गाड्यांमध्ये बॅटरी आणि इंधनाच्या गाड्यांमध्ये पेट्रोल-डिझेल वापरले जाते.
आयएमएफच्या रिपोर्टनुसार कारची एक बॅटरी बनविण्यासाठी ८ किलो लिथिअम, ६-१२ किलो कोबाल्ट आणि ३५ किलो मॅगनिज वापरले जाते. कोबाल्ट खूप दुर्मिळ आहे, यामुळे अनेक ठिकाणी निकेल वापरले जाते. निकेलचे उत्खनन हे पर्यावरणासाठी खूप मोठा धोक्याचे आहे.
लिथिअम आणि कोबाल्ट सारख्या धातूच्या मायनिंगमुळे इलेक्ट्रीक गाड्यांचे कार्बन उत्सर्जन हे सामान्य गाड्यांपेक्षा खूप जास्त असते.
इलेक्ट्रिक वाहने (EVs) पारंपारिक पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा जास्त प्रदूषण पसरवू शकतात, असे अलीकडल्याच काही अभ्यासांतून समोर आले आहे. कसे ते पाहुया...
इमिशन अॅनालिटिक्सच्या अहवालानुसार, ईव्ही ब्रेक आणि टायर्समधील कणयुक्त पदार्थ हे इंधन वाहनांपेक्षा १,८५० पट जास्त असू शकतात. ईव्हीचे वजन जास्त असते, जास्त वजनामुळे टायर्स आणि ब्रेकवर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे झीज वाढते आणि जास्त कण उत्सर्जन होते.
शिवाय भारतासारख्या देशात बहुतांशी वीज ही कोळशावर तयार केली जाते. इतर इंधनापासून निघणारा धूर आणि कोळसा जाळून निघणारा धूर यात फार नसले तरी कार्बन सोडण्याचे प्रमाण कोळशाचे जास्त आहे. मग ईव्ही वाहने पर्यावरण पुरक कशी ठरू शकतात, असाही प्रश्न पडू शकतो.
ईव्ही कुठे फायद्याची वाटू शकते...
ईव्ही ही इंधनाच्या वाहनांपेक्षा पर्यावरणाला सर्वाधिक घातक आहे. परंतू, ती धूर सोडत नाही हा तिचा फायदा आहे. धूर सोडत नसल्याने ती शहरात प्रदूषण कमी करू शकते. शहरी भागात हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते.