उसतोड कामगाराने कोयत्याने वार करून पत्नीचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 17:16 IST2018-12-21T17:15:29+5:302018-12-21T17:16:10+5:30
आरोपी पती घटनेनंतर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

उसतोड कामगाराने कोयत्याने वार करून पत्नीचा केला खून
परभणी : विदर्भातून ऊसतोडीसाठी आलेल्या एका कामगाराने कोयत्याचे वार करुन पत्नीचा खून केल्याची घटना २० डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील महागाव येथे घडली. आरोपी पती घटनेनंतर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
उमरखेड (जि.यवतमाळ) तालुक्यातील तिरंजी येथील अशोक विश्वनाथ कांबळे हे आपल्या कुटुंबासह पूर्णा तालुक्यातील महागाव येथे ऊसतोडीसाठी आले होते. हे कुटुंबिय १४ नोव्हेंबरपासून या भागात होते. दरम्यान, २० डिसेंबर रोजी ऊसतोडीचे काम अटोपल्यानंतर अशोक कांबळे व त्यांची पत्नी सागरबाई कांबळे हे दोघेही याच परिसरात असलेल्या राहोट्यामध्ये परत गेले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अशोक विश्वनाथ कांबळे हे पत्नीसह जळतन आणण्याचे निमित्त करुन कोयता घेऊन बाहेर पडले. याच दरम्यान त्यांची पत्नी सागरबाई अशोक कांबळे (४०) यांचा कोयत्याचा वार करुन खून केल्याचा प्रकार ८.३० वाजेच्या सुमारास समोर आला.
घटनेनंतर आरोपी अशोक विश्वनाथ कांबळे हा फरार झाला आहे. मयत सागरबाई कांबळे यांना दोन मुली व एक मुलगा अशी अपत्य आहेत. या प्रकरणी मुकादाम जमीर शेख मजीद यांनी ताडकळस पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यावरुन अशोक कांबळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटेकर हे करीत आहेत. दरम्यान, अशोक कांबळे यांनी पत्नीचा खून का केला, याची माहिती अद्याप समोर आली नाही.