पार्टीसाठी कोंबड्या दिल्या नाहीत म्हणून पतीची पत्नीस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 14:28 IST2021-05-26T14:26:57+5:302021-05-26T14:28:12+5:30
तालुक्यातील धनगरमोहा येथील पार्वती मोतीराम मदने यांनी शेतातील घरी कोंबड्या पोसलेल्या आहेत.

पार्टीसाठी कोंबड्या दिल्या नाहीत म्हणून पतीची पत्नीस मारहाण
गंगाखेड : पती व चुलत दिर पार्टी करण्यासाठी घरी पोसलेल्या दोन कोंबड्या घेऊन जात असतांना कोंबड्या नेऊ नका म्हणताच पती व चुलत दिराने पत्नीस मारहाण केल्याची घटना दि. २५ मे रोजी तालुक्यातील धनगरमोहा येथे घडली. कोंबडीवरून पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीसह चुलत दिराविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील धनगरमोहा येथील पार्वती मोतीराम मदने यांनी शेतातील घरी कोंबड्या पोसलेल्या आहेत. दि. २५ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पार्वती मदने यांचे पती मोतीराम नारायण मदने व चुलत दिर माणिक ज्ञानोबा मदने हे दोघे घरी येऊन दोन कोंबड्या घेऊन जाऊ लागले. तेंव्हा कोंबड्या कुठे घेऊन जात असे म्हणत पार्वतीबाई मदने यांनी पती व दिराला विचारले असता पार्टी करण्यासाठी कोंबडया नेत असल्याचे पतीने सांगितले.
पार्टी करण्यासाठी कोंबड्या घेऊन जाऊ नका असे पार्वतीबाई मदने यांनी म्हणताच पती मोतीराम मदने याने शिवीगाळ करून त्यांना थापड बुक्क्यांनी मारहाण केली. तर कोंबड्या का नेऊ देत नाही म्हणत चुलत दिर माणिक मदने याने ही शिवीगाळ करून दगडाने उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारून जखमी केले असल्याची फिर्याद पार्वतीबाई मोतीराम मदने यांनी दिली. यावरून दि. २५ मे रोजी रात्री उशीराने पती मोतीराम मदने व चुलत दिर माणिक मदने ( दोघे रा. धनगरमोहा ता. गंगाखेड ) यांच्या विरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोउपनि टी. टी. शिंदे करीत आहेत.