गावच्या थांब्यावर बस का थांबवली नाही? रस्ता अडवला, बसमध्ये घुसून चालकास मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 19:28 IST2023-04-07T19:28:03+5:302023-04-07T19:28:27+5:30
या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गावच्या थांब्यावर बस का थांबवली नाही? रस्ता अडवला, बसमध्ये घुसून चालकास मारहाण
पाथरी - गावच्या थांब्यावर बस का थांबवली नाही? असा जाब विचारत एकाने बसच्या समोर दुचाकी आडवी लावली. त्यानंतर कॅबिन मध्ये घुसून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना पाथरी - सोनपेठ रस्त्यावर टाकळगव्हाण तांडा येथे आज दुपारी घडली. घटनेनंतर चालकाने बस थेट ठाण्यात नेली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .
पाथरी स्थानकातील बस ( क्रमांक एम एच २० बीएल ३९७०) परळी येथून पाथरी येथे येत होती. दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास टाकळगाव तांडा येथे धोंडीराम बापूराव राठोड याने बस समोर दुचाकी आडवी लावली. तसेच बसमध्ये घुसून चालक गणेश रंगनाथ कांबळे यांना टाकळगव्हाण तांडा थांब्यावर बस उभी का केली नाही असा जाब विचारत मारहाण केली. त्यानंतर चालकाने बस थेट पाथरी पोलीस ठाण्यात नेली. येथे चालक गणेश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून धोंडीराम बापूराव राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सहपोलीस निरीक्षक बी.आर .बंदखडके व पोह. गजानन पिंपळपल्ले यांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.