'Where did the social workers who were protesting in our time go? Ask Ajit Pawar | 'आमच्यावेळी आंदोलन करणारे समाजसेवक कुठे गेले? त्यांची दातखिळी बसलीय का?'

'आमच्यावेळी आंदोलन करणारे समाजसेवक कुठे गेले? त्यांची दातखिळी बसलीय का?'

परभणी - माहिती अधिकाराचा कायदा कडक करा म्हणून अनेक समाजसेवक ओरडत होते. आंदोलन करत होते आणि आज भाजपाने माहिती अधिकार कायदा संपवला असताना आमच्या वेळी आंदोलन करणारे समाजसेवक आता कुठे गेले? यांची दातखिळी बसलीय का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी जिंतूरच्या जाहीर सभेत केला.

यासभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, महादेवासारखा तिसरा डोळा उघडून या सरकारला आपल्याला घालवण्याची गरज आहे. निवडणुका जवळ येत आहेत. ३७० चा मुद्दा इथे काढतील. तो मुद्दा जम्मू आणि काश्मीरचा आहे. त्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही भाजप सरकारला पाच वर्षांत काय केले हे विचारा असे. या सरकारनं पोलीस भरती राबवली नाही.सुरक्षा व्यवस्था भक्कम नसल्यानं राज्यात गुन्हेगारी वाढलीय. एकट्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात एका रात्रीत ३ खून होतात! स्व. आर.आर. पाटील आणि आम्ही सर्वांनी मिळून दरवर्षी 13 हजार याप्रमाणे ५ वर्षांत ६५ हजार पोलिसांची भरती केली.

तसेच गेल्या ५ वर्षांत माझ्या परभणीत, सेलू, जिंतूरमध्ये एकही कारखाना या सरकारनं आणला नाही. मग हाताला कामं कशी मिळणार? आता व्यवसाय होत नाही. माल खपत नाही. ऊस, कापूस, सोयाबीनला योग्य भाव नाही. शेतकऱ्यांचे कैवारी फक्त पवार साहेब होते. याची जाणीव शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे असं आवाहन अजित पवारांनी शेतकऱ्यांना केलं. 

महाराष्ट्राचा बळीराजा अजूनही विचारतोय की, कर्जमाफी केव्हा मिळणार? ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा या सरकारनं गेल्या निवडणुकीत केली. किती शेतकऱ्यांना खरोखर याचा लाभ झाला, असा प्रश्न यांच्या आमदारांना विचारा. तो तुमचा हक्क आहे. राज्यकर्ते सत्तेत मश्गुल झाले आहेत. त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. तीन- तीन वर्षे कर्जमाफी यांच्या काकाने केली होती माझ्या काकांने एका फटक्यात दिली होती अशी आठवण अजित पवार यांनी करून दिली. 

दरम्यान आम्हाला सत्ता द्या. पहिल्या तीन महिन्यात सातबारा कोरा नाही केला तर नाव सांगणार नाही शिवस्वराज्य यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकसभेत जे केले ते विधानसभेत करु नका असे आवाहन परभणीतील जनतेला अजित पवार यांनी केले.

Web Title: 'Where did the social workers who were protesting in our time go? Ask Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.