परभणीवर 'जलसंकट'! १४ कोटींच्या थकबाकीसाठी महावितरणने तोडला मनपाचा वीज पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 20:07 IST2026-01-23T20:07:54+5:302026-01-23T20:07:54+5:30
कारेगाव, रहाटी आणि धर्मापुरीचे पंप झाले बंद; २६ जानेवारीपर्यंत पाणी मिळणं कठीण.

परभणीवर 'जलसंकट'! १४ कोटींच्या थकबाकीसाठी महावितरणने तोडला मनपाचा वीज पुरवठा
परभणी: परभणीकरांसाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. महापालिकेने विजेची थकबाकी न भरल्यामुळे महावितरणनेपाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख केंद्रांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे येत्या २६ जानेवारीपर्यंत शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होण्याची चिन्हे असून, शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण? परभणी शहराला येलदरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी रहाटी, कारेगाव आणि धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून तिथून शहराच्या विविध भागांतील जलकुंभांमध्ये सोडले जाते. मात्र, या चारही ठिकाणच्या वीज देयकांचे तब्बल १४ कोटी रुपये महानगरपालिकेने महावितरणला दिलेले नाहीत. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने अखेर शुक्रवारी महावितरणने कठोर पाऊल उचलत वीजपुरवठा खंडित केला.
४ दिवस पाणी मिळण्याची शक्यता
धूसर शुक्रवारी वीज तोडल्यामुळे शनिवारी आणि रविवारी बँकांचे कामकाज बंद असल्याने महानगरपालिकेकडून तातडीने निधीची तरतूद होणे अशक्य दिसत आहे. सोमवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्याने, तोपर्यंत वीज जोडणी पूर्ववत होण्याची शक्यता कमी आहे. याचा अर्थ किमान सोमवारपर्यंत शहरातील नळ कोरडेच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जनतेत संतापाची लाट
महापालिका आणि महावितरण या दोन शासकीय यंत्रणांच्या वादात सामान्य जनतेला का वेठीस धरले जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आधीच विस्कळीत असलेल्या पाणीपुरवठ्याला आता 'शॉर्ट सर्किट' लागल्याने परभणीकरांचे हाल होणार आहेत. आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यातून काय मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.