मद्यपानकरून फ्री स्टाईल हाणामारी करणारे दोन्ही पोलीस कर्मचारी निलंबित
By राजन मगरुळकर | Updated: September 27, 2023 17:20 IST2023-09-27T17:19:55+5:302023-09-27T17:20:28+5:30
पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका; पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांचे आदेश

मद्यपानकरून फ्री स्टाईल हाणामारी करणारे दोन्ही पोलीस कर्मचारी निलंबित
परभणी : सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करून गंभीर स्वरूपाचे कृत्य केल्याप्रकरणी व पोलीस दलाची प्रतिमा मलिन करीत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी सोमवारी काढले आहेत.
जिल्हा पोलीस दलातील गंगाखेड येथे कर्तव्यावर असलेल्या या दोन कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ज्यामध्ये रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गंगाखेड पोलीस स्टेशन समोरील सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन करून एकमेकांशी मारामारी केल्याचा प्रकार या दोन कर्मचाऱ्यांत घडला होता. यामध्ये गंगाखेड पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गोविंद बळीराम गीते आणि गंगाखेडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील यशवंत गोपीनाथ कुटे यांचा समावेश आहे.
जबाबदार, कर्तव्यनिष्ठ पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असताना सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करून गंभीर स्वरूपाचे कृत्य केल्याचे उघड झाल्याने याबाबत पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. याबाबतचे आदेश सोमवारी काढण्यात आले आहेत. निलंबन कालावधीतील दोन्ही कर्मचाऱ्यांचे मुख्यालय हे पोलीस मुख्यालय राहणार असल्याचे या आदेशात नमूद केले आहे.