गंगाखेडजवळ ट्रॅव्हल्स-बसचा भीषण अपघात; बसचालकाचा मृत्यू, ३१ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:18 IST2022-07-29T14:16:33+5:302022-07-29T14:18:33+5:30
दोन्ही गाड्यातील ३१ प्रवासी जखमी झाले होते. यात १० प्रवास्यांसोबत बस चालक गंभीर जखमी होते.

गंगाखेडजवळ ट्रॅव्हल्स-बसचा भीषण अपघात; बसचालकाचा मृत्यू, ३१ प्रवासी जखमी
गंगाखेड (परभणी): परळी - गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर करम उकडगावजवळ गुरुवारी रात्री १०:३० वाजेच्यासुमारास ट्रॅव्हल्स व बसचा भीषण अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या बस चालकाचा परभणी येथे उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला. हनुमान नामदेव व्हावळे ( ४३, रा.शेडगा ता.गंगाखेड ) असे मृत चालकाचे नाव आहे. दरम्यान, यात दोन्ही गाड्यांमधील मिळून एकूण ३१ प्रवासी जखमी झाले आहेत.
गुरुवारी रात्री परळी डेपोची बस गंगाखेड - परळी राष्ट्रीय महामार्गावरून लातूरमार्गे नागपूरकडे जात होती. तर गंगाखेड येथून एका खाजगी बस पुण्याकडे परळीमार्गे जात होती. दरम्यान, निळा पाटी ते करम उकडगाव दरम्यान बस आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात दोन्ही गाड्यातील ३१ प्रवासी जखमी झाले होते. यात १० प्रवास्यांसोबत बस चालक हनुमान व्हावळे हे गंभीर जखमीहोते. उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर व्हावळे यांना अधिक उपचारासाठी परभणीला रवाना करण्यात आले होते.
दरम्यान, आज पहाटे उपचारादरम्यान व्हावळे यांचा मृत्यू झाला. अपघातात ट्रॅव्हल्स व बसमधील एकूण ३१ प्रवासी जखमी झाले होते. यातील दहा जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर परभणी येथे शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.