भरधाव ट्रक थेट रुळावर आला, चालकाच्या प्रसंगावधानाने १०० मीटर अंतरावर थांबली रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:23 IST2025-01-31T18:22:08+5:302025-01-31T18:23:41+5:30
सारवाडी - कोडी रेल्वे पटरीवरील घटना; ट्रक चालकाने केले पलायन

भरधाव ट्रक थेट रुळावर आला, चालकाच्या प्रसंगावधानाने १०० मीटर अंतरावर थांबली रेल्वे
- प्रमोद साळवे
गंगाखेड (जि.परभणी) : मुंबईहून नांदेडकडे निघालेली तपोवन एक्सप्रेस रेल्वे क्रं १७६१७ जालन्याच्या पुढे सारवाडी - कोडी शिवारात आली असता अचानक मालवाहतूक ट्रक क्रं (एमएच- २१ डी- ९२७५) रेल्वे पटरीवर येऊन थांबला. गोंधळलेल्या ट्रक चालकाने पलायन केले. रेल्वे चालकाने मात्र समयसूचकता व प्रसंगावधान दाखवत ट्रकपासून १०० मीटर अंतरावर तातडीचे ब्रेक लावल्याने रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना टळली. शुक्रवारी (ता.३१) रोजी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. सुमारे ४० ते ४५ मिनिटे या प्रकारामुळे रेल्वे वाहतूक खोळंबली होती. दरम्यान ट्रक चालकाने पलायन केल्याची माहिती आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी, मुंबईहून नांदेडकडे निघालेली तपोवन एक्सप्रेस दुपारी ३ वाजता जालन्याच्या पुढे सारवाडी- कोडी शिवारात येताच समोर मालवाहतूक ट्रक एन रेल्वे पटरीवर येऊन थांबल्याचे रेल्वे चालकाच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून समयसुचकतेने प्रसंगावधान साधत रेल्वे चालकाने १०० मीटर अंतरावर ब्रेक केले. घाबरलेल्या ट्रक चालकाने तत्काळ पलायन केले.
दरम्यान, रेल्वे चालकाने मात्र परिस्थिती नियंत्रणात आणत रेल्वे अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन उपस्थित प्रवाशांची मदत घेतली. संपूर्ण परिस्थिती निवळण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागल्याची माहिती आहे. ट्रक चालकाची अक्षम्य चूक शेकडो रेल्वे प्रवाशांच्या जीवावर बेतली असती. मात्र, रेल्वे चालकाने दाखवलेल्या हिमतीने दुर्घटना टळल्याची प्रत्यक्षदर्शी प्रवासी, सपोउपनिरीक्षक प्रदीप हीरक यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.