वाळू माफियांवर कारवाईसाठी वाहनांवर लग्न समारंभाचे फलक लावून पथक पोहोचले नदीपात्रात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:57 IST2025-02-24T15:56:44+5:302025-02-24T15:57:18+5:30
उमरा येथे दोन ट्रॅक्टर, दोन केणी जप्त : माफियांनी काढला पळ

वाळू माफियांवर कारवाईसाठी वाहनांवर लग्न समारंभाचे फलक लावून पथक पोहोचले नदीपात्रात
पाथरी : उमरा येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उत्खनन होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांना मिळाली. त्यांच्या पथकाने धाड टाकून दोन ट्रॅक्टर आणि दोन केणी जप्त केल्याची कारवाई शुक्रवारी सायंकाळी केली. गौण खनिज माफियांनी तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, अधिकाऱ्यांचे शासकीय वाहन व निवासस्थान या ठिकाणी लोकेशनसाठी व्यक्ती किंवा विविध साधने यांचा वापर सुरू केला आहे. ज्यामुळे अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी खासगी वाहन किंवा वेगळी शक्कल लढवावी लागत आहे. उमरा येथील कार्यवाहीत वाहनावर लग्न समारंभाचे दर्शित फलक लावून अधिकारी व कर्मचारी अचानक गोदाकाठी पोहोचल्याने गौण माफियांनी पथकास पाहून पळ काढला.
गोदावरी नदीच्या पात्रात अवैध गौण खनिज उत्खनन विरोधी पथक विजय भादर्गे, सय्यद साजिद, सचिन साबळे, संदीप बडगुजर यांनी खासगी वाहनाद्वारे उमरा येथे होत असलेल्या अवैधरीत्या वाळू उत्खननाच्या ठिकाणी स्वत: उपविभागीय अधिकारी पाथरी शैलेश लाहोटी यांच्यासोबत जाऊन संबंधित ठिकाणावरून दोन ट्रॅक्टर, दोन केणी व अन्य साहित्य जप्त करून तहसील कार्यालयात पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी अडकून ठेवले आहे.
दुचाकीवरून केला पाठलाग...
मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ढालेगाव येथून वाळू भरून पाथरी येथील वडी गावाजवळ (क्र. एमएच ०२ एक्सए ७८१०) जात असल्याची माहिती पाथरीचे तहसीलदार एस. एन. हांदेशवार यांना मिळाली. तलाठी रामप्रसाद कोल्हे यांच्यासोबत दुचाकीवरून वाहनाचा पाठलाग करून वाहन तहसील कार्यालयात आणले. वाहनात अंदाजे दोन ब्रास वाळू आढळली. वाहन दंडात्मक कार्यवाहीसाठी अडकून ठेवल्याची माहिती शैलेश लाहोटी यांनी दिली.