स्कूलबस रस्त्याखाली उतरून शेतात उलटली, ३० विद्यार्थी बालंबाल बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 14:41 IST2023-09-23T14:40:03+5:302023-09-23T14:41:07+5:30
या अपघातात ४ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे

स्कूलबस रस्त्याखाली उतरून शेतात उलटली, ३० विद्यार्थी बालंबाल बचावले
- अनिल शेटे
गंगाखेड: हरंगुळ ते धनमोहा मार्गावर आज सकाळी ८ वाजता अचानक एक स्कूल बस उलटली. यात चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.
खाजगी शाळेची एक स्कूल बस आज सकाळी मानकादेवी, उखळी, धनगर मोहा, हरंगुळ येथून विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघाली. धनगरमोहा ते हरंगुळ रस्त्यावर अचानक स्कूलबस रोडखाली जात शेतात उलटली. यामुळे विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. हे दृश्य पाहताच परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि वाहकांनी धाव घेत स्कूलबस मधून विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
बसमध्ये अंदाजे ३० विद्यार्थी होते. जखमी विद्यार्थ्यांना खाजगी तसेच उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विद्यार्थी श्रेया नागरगोजे ( रा.उखळी), इमरान स.शेख ( ७), अनुष्का फड (१४), आदर्श गायकवाड (११) यांना किरकोळ दुखापती झाली. वैद्यकीय अधिकारी अजित पवार, परीचारीका वैशाली भालेराव, पुजा कांबळे, रशिद शाह यांनी तत्काळ उपचार केले.