वाळू माफियांचे धाडस वाढले; परवाना विचारल्याने दोन पोलीसांच्या अंगावर घातले ट्रॅक्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 17:54 IST2023-02-14T17:54:48+5:302023-02-14T17:54:48+5:30
जिंतरमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वाळू माफियांचे धाडस वाढले; परवाना विचारल्याने दोन पोलीसांच्या अंगावर घातले ट्रॅक्टर
- विजय चोरडिया
जिंतूर : अवैधरितीने वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध जिंतूर परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जिंतूर- औंढा टी पॉईंटवर घडली आहे.
अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर औंढा रस्त्याने शहरात येत असल्याच्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे व त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी रोकडे, लबडे, उंकडे हे दुचाकीवरून औंढा टी पॉईंटवर सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उभे असतांना पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर अडवले. त्यापैकी एका ट्रॅक्टरवाल्याला वाळू वाहतुकीचा परवाना आहे का ? असे विचारले असता त्यांनी वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. दुसऱ्या ट्रॅक्टरवाल्याने मात्र थांबवलेले ट्रॅक्टर चालू करून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा पोलीस कर्मचारी रोकडे व लबडे यांनी दुचाकीवर पाठलाग केला असता सदरील ट्रक्टर चालकाने त्यांच्या दुचाकीवर ट्रक्टर टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत ट्रक्टर चालक तेजस व मालक श्रीधर देवळे दोघे (रा.यसेगाव, ता.जिंतूर) व दुसरा ट्रक्टर चालक तुकाराम कामाजी घनवटे व मालक रामकिशन बाबाराव बुधवंत (दोघे रा.पांगरी, ता.जिंतूर) या चार जणांविरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकास घेतले ताब्यात
पोलिसांनी यातील तुकाराम घनवटे यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक ट्रक्टर हेड व वाळूने भरलेली एक ट्राँली असा एकूण पाच लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक ट्रॅक्टरवाला मात्र ट्रॅक्टर घेऊन फरार झाला आहे.