परभणी-वसमत महामार्गावर भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत तीन ठार, दोन गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 15:53 IST2025-12-06T15:42:30+5:302025-12-06T15:53:00+5:30
राहटीपुलाजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात

परभणी-वसमत महामार्गावर भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत तीन ठार, दोन गंभीर जखमी
परभणी : तालूक्यातील रहाटी गावाजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. या मार्गावरील अपघातांची मालिका कायम राहिल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबाराव दतराव साखरे हे कार एमएच ३८ एडी ३५४१ क्रमांकाच्या कारने आरळहून परभणीकडे जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या कार क्रमांक एमएच २२ बीसी ७८८८ च्या चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात गाडी चालवत जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज प्रचंड मोठा असल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात बाबाराव दतराव साखरे, कांताबाई अंबादास कोतोरे (दोघे, रा. आरळ, ता. वसमत),विमलबाई बालासाहेब जाधव (रा. पिंगळी, ता. परभणी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघातात साईनाथ रामचंद्र काकडे आणि हरीभाऊ बालासाहेब जाधव, प्रल्हाद रामराव जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. वाहनांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. माहिती मिळताच ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.