निवडणुकीपुरते गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना ‘स्वराज्य’ धडा शिकवेल : छत्रपती संभाजीराजे
By राजन मगरुळकर | Updated: November 19, 2022 18:36 IST2022-11-19T18:36:05+5:302022-11-19T18:36:24+5:30
छत्रपती संभाजीराजे हे सध्या स्वराज्य विस्तारासाठी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.

निवडणुकीपुरते गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना ‘स्वराज्य’ धडा शिकवेल : छत्रपती संभाजीराजे
परभणी : जिल्ह्यात आल्यानंतर गावागावात फिरताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींनी नेहमीच या गावांकडे दुर्लक्ष केले आहे. आजपर्यंत एकदाही डांबरी रस्ते न झालेली अनेक गावे आहेत. केवळ निवडणुकीपुरते या गावांमध्ये येऊन नंतर या गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकप्रतिनिधींना ‘स्वराज्य’ धडा शिकवेल, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.
छत्रपती संभाजीराजे हे सध्या स्वराज्य विस्तारासाठी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी पूर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथे शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यातील गावोगावी स्वराज्याच्या शाखा उद्घाटनासाठी छत्रपती संभाजीराजे हे स्वतः गावागावात जात आहेत. गावकऱ्यांशी संवाद साधून ते त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, जनतेचे स्वराज्यावरील हे अफाट प्रेमच स्वराज्याची ताकद आहे. ही ताकद याच जनतेच्या विकासासाठी, उन्नतीसाठी एकवटली जाईल, असेही ते म्हणाले.
पूर्णा तालुक्यातील २५ गावांत स्वराज्य संघटनेच्या शाखांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वराज्य प्रवक्ते करण गायकर, धनंजय जाधव, माधव देवसरकर, गंगाधर अण्णा काळकुटे, आप्पासाहेब कुडेकर, जिल्हा निमंत्रक नितीन देशमुख, तालुका निमंत्रक साहेबराव कल्याणकर, माधव आवरगंड, माऊली कदम, मंगेश कदम, शिवराज जोगदंड, गजानन जोगदंड, संजय पवार यासह स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपास्थित होते.