पती-पत्नीचा संशयास्पद अंत; पतीचा गळफास तर पत्नीचा पलंगावर आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 11:59 IST2022-03-28T11:58:05+5:302022-03-28T11:59:59+5:30
तीन वर्षापूर्वीचा झाला होता विवाह

पती-पत्नीचा संशयास्पद अंत; पतीचा गळफास तर पत्नीचा पलंगावर आढळला मृतदेह
सेलू ( परभणी ) : येथील राजवी गांधी नगरात आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास पती आणि पत्नीचे संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एका खोलीत पतीने गळफास घेतलेला तर पत्नीचा मृतदेह पलंगावर आढळून आला. प्रियांका ( २८) व अर्जुन गणेश आवटे (३२) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अर्जुन गणेश आवटे हा रिक्षाचालक होता. तो पत्नी प्रियांकासह राजीव गांधी नगरात राहत असे. तीन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. आवटे पती-पत्नी रविवारी रात्री जेवणानंतर घरातील एका खोलीत झोपले होते. आज सकाळी ७ वाजले तरी दोघेही झोपेतून उठले नसल्याने अर्जुनच्या बहिणीने रूमची कडी वाजवली, तरीही ते बाहेर आले नाहीत. अर्जुनच्या बहिणीने याची माहिती वडीलांना दिली. त्यानंतर दरवाजा तोडून पाहिले असता दोघेही मृत अवस्थेत आढळून आल्याने साऱ्यांना धक्का बसला.
अर्जुन याचा मृतदेह नायलॉन दोरीच्या सहायाने गळफास घेतलेला तर प्रियंकाचा मृतदेह पलंगावर आढळून आला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी घटनास्थळाची भेट देऊन पंचनामा केला.