शेतातील पाईप फोडणाऱ्या हायवावर दगडफेक; पाथरीत वाळूमाफिया अन् ग्रामस्थांत मध्यरात्री राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 20:28 IST2025-04-10T20:27:16+5:302025-04-10T20:28:14+5:30
पाथरी तालुक्यात माफियांचा हैदोस :संतप्त ग्रामस्थांनी वाळूच्या ट्रकच्या काचा फोडल्या. यानंतर हा ट्रक पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आला.

शेतातील पाईप फोडणाऱ्या हायवावर दगडफेक; पाथरीत वाळूमाफिया अन् ग्रामस्थांत मध्यरात्री राडा
पाथरी (जि.परभणी) : गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने तुरा गावाजवळील शेतकऱ्याची पाईपलाईन फुटल्याने संतप्त ग्रामस्थांनी वाळूच्या हायवाची काच फोडली. त्यानंतर माफियांच्या मदतीस आलेल्या इतर काही जणांच्या दुचाकीही फोडल्याची घटना ९ एप्रिल रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली. हे दोन्ही हायवा जप्त केले असून, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पाथरी तालुक्यात गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन केले जाते. वाळू उत्खनन सुरू असताना प्रशासन मात्र किरकोळ कारवाई करून मलमपट्टी केल्याचे दाखविते. यामुळे वाळूमाफियांचे धाडस चांगलेच वाढले असून, यंत्रणेला ते जुमानत नाहीत. त्यामुळे ही मंडळी सामान्यांनाही त्रास देत आहे. असाच प्रकार ९ एप्रिल रोजी रात्री ११ च्या सुमारास तुरा येथे घडला. तुरा गावापासून कॅनॉल मार्गे गुंजकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर माफियांकडून वाळू वाहतुकीसाठी केला जात आहे. याच रस्त्यावर वाळूच्या हायवाने एका शेतकऱ्याची पाईपलाईन फुटली. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी गाव परिसरात वाळूचा हायवा अडवला. भरपाईची मागणी केली. मात्र माफियांनी अरेरावी केली. पाथरीतून काही जणांना बोलावून शेतकऱ्यालाच मारहाण केली.
त्यानंतर अक्षरशः गाव एकवटले. त्यांनी रस्त्यावर असलेल्या हायवाच्या काचा फोडल्या. गावापुढे माफिया व त्यांनी बोलावलेल्या गुंडांचेही काही चालले नाही. हायवा जागीच सोडून अक्षरश: पळून जाण्यात धन्यता मानावी लागली. या घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी व स्थानिक पोलीस प्रशासनाला कळविली. घटनास्थळी अधिकारी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी माफियांच्या मुजोरीचा पाढा वाचला. तर यातून होणारा त्रास व नुकसानीची माहिती दिली. शिवाय जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत वाहन येथून हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी या वाहनावर कारवाईचे आश्वासन दिले. हा प्रकार रात्री ११ वाजता सुरू होऊन पहाटे उशिरापर्यंत सुरूच होता.
दोन वाहनांवर पोलिसात गुन्हा दाखल
या घटनेनंतर पाथरी पोलिसांनी दोन हायवा ट्रकवर अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ग्रामस्थांच्या रेट्यापुढे ही कारवाई करणे भाग पडले.
तडीपारीचे दिले आश्वासन
अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनावर आजपर्यंत अनेक कारवाया झाल्या. मात्र एकाही वाळूमाफियावर तडीपारीची कारवाई झाली नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांनी मात्र आता या प्रकरणात तडीपारीची कारवाई करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
यापुढे अवैध वाहतूक बंद करावी
गुंज, गोंडगाव या भागातून येणारी अवैध वाहतुकीची वाहने तुरा गावातून येतात. गावात या रस्त्यावर जिल्हा परिषदेची शाळा आहे. दिवसाढवळ्या वाहने वेगाने जात असल्याने येथील शाळकरी मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या भागातून अवैध वाहतुकीची वाहने कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.