भरधाव कार २०० मीटर अंतरात ४ ते ५ वेळेस पलटली; अपघातात एकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:04 IST2025-02-03T19:02:23+5:302025-02-03T19:04:10+5:30
गंगाखेडजवळ घडली घटना; महातपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते नागोराव (खुंडाजी) दंडवते यांचा मृत्यू

भरधाव कार २०० मीटर अंतरात ४ ते ५ वेळेस पलटली; अपघातात एकाचा जागीच मृत्यू
गंगाखेड (जि.परभणी) : गंगाखेड-परळी राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे ५ वाजता झालेल्या भरधाव कार (क्र. एमएच ४३- डी ९६९१)च्या भीषण अपघातात नागोराव (कडाजी) खुंडाजी दंडवते (४९, रा.महातपुरी) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, २०० मीटर अंतरात ४ ते ५ वेळेस कार पलटल्याची माहिती आहे.
याबाबतची माहिती अशी की, परळीहून गंगाखेडकडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गंगाखेड शहरानजीक गोकुळ हॉटेलसमोर कार रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटली. कारने अक्षरशः २०० मीटर अंतरात रस्त्याच्या खाली ४ ते ५ वेळा पलटी मारली. कारमध्ये असलेले तालुक्यातील महातपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते नागोराव (खुंडाजी) दंडवते यांचा कारमध्ये जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये असलेल्या राधाकिशन कुंडाजी दंडवते व मुंजा आळसे यांना कुठलीही इजा झालेली नाही. घटनेची माहिती प्राप्त होताच, गंगाखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. महातपुरी येथील ग्रामस्थांनी घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.