सोमनाथ सूर्यवंशी यांना कोठडीत मारहाण नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:36 IST2024-12-20T13:32:25+5:302024-12-20T13:36:10+5:30

वादग्रस्त पीआय अशोक घोरबांड यांची चौकशी करण्यात येणार; परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Somnath Suryavanshi was not beaten in police custody; Chief Minister Devendra Fadnavis' statement in the Legislative Assembly | सोमनाथ सूर्यवंशी यांना कोठडीत मारहाण नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन

सोमनाथ सूर्यवंशी यांना कोठडीत मारहाण नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन

परभणी: शहरातील संविधान प्रतिकृतीची तोडफोड अन् अवमान प्रकरणी परभणी बंद दरम्यान हिंसाचार झाला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत आंदोलकांसोबत निरपराध नागरिकांवर बळाचा वापर करत अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. यामुळे पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे संविधान प्रतिकृती अवमानना, पोलिसांची कारवाई ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूवर बोलले आहेत. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधान प्रतिकृती अवमानना करणारा आरोपी पवार मनोरुग्ण असून २०१२ पासून त्याच्यावर उपचार सुरू. चार वैद्यकीय तज्ञांच्या पथकाने तपासणी करून तो मनोरुग्ण असल्याचा अहवाल दिला आहे. सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला त्यानंतर पाच तासांनी संविधान तोडफोड घटना घडली. मोर्चात फक्त बांगलादेश येथील हिंदू यावर साधू बोलले. मोर्चाचा आणि घटनेचा संबंध नाही. मनोरुग्ण आरोपी बहिणीच्या घरून आला होता, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच दुसऱ्या दिवशी बंद दरम्यान जाळपोळ आणि हिंसाचार झाला. या प्रकरणी ५१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील ४२ पुरुष ३ महिला ६ अल्पवयीन होते, महिला आणि अल्पवयीन यांना नोटिस देऊन सोडण्यात आले. पुरुषांना तीन गुन्ह्यात अटक करण्यात आले. हे सहा वाजेपर्यंत सुरू होते. जे व्हिडिओ फुटेजमध्ये तोडफोड करताना दिसले अशा लोकांवरच ही कारवाई करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांची चौकशी 
दुसऱ्या दिवशी बंद दरम्यान बहुतांश आंदोलक शांततेत आंदोलन करत होते.केवळ दोन तीनशे आंदोलकांनी जाळपोळ केली. यात सामान्य नागरिकांचे वाहने, दुकाने यांचे दीड कोटींच्यावर नुकसान झाले. त्याच दिवशी सायंकाळी मला वंचितचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांचा मला फोन आला. परभणीमध्ये कोंबिंग ऑपरेशन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मी लागलीच आयजी यांना फोन केला तेव्हा केवळ व्हिडिओमध्ये दिसणाऱ्यांवर कारवाई आहे, कोंबिंग नसल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी आंदोलकांवर कारवाई दरम्यान वाजवी पेक्षा अधिक बळाचा वापर केला का ? याची चौकशी करण्यात येईल. तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच मानवते या महिलेला पोलिसांनी मारहाण केली यावर फडणवीस म्हणाले की, त्या अतिआक्रमक होत्या. त्यांनी महिला पोलिसावर हल्ला केला. त्यांमुळे पोलिसांनी त्यांना गाडीत उचलून नेले.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूवर...
जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये सोमनाथ सूर्यवंशी दिसले म्हणून त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना दोन वेळा न्यायालयात उभे केले. यावेळी त्यांनी पोलिसांनी मारहाण केली नसल्याचे न्यायाधीशांना सांगितले. तसेच पोलिस कोठडीमधील फुटेज उपलब्ध आहे. त्यांना पोलिस कोठडीत कुठेही मारहाण केल्याचे दिसत नाही. वैद्यकीय तपसणीत त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या शरीरावर जुन्या जखमा आहेत, त्याचा उल्लेख आहे. त्यांना पोलिस कस्टडीमधून न्यायालयीन कस्टडीत नेले. सकाळी त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना जळजळ होत असल्याचे सांगितले. तेव्हा रुग्णालयात नेले असता सोमनाथ यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या संपूर्ण प्रकरणात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. तसेच सोमनाथच्या कुटुंबाला शासनाकडून १० लाखांची मदत देण्यात येईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

Web Title: Somnath Suryavanshi was not beaten in police custody; Chief Minister Devendra Fadnavis' statement in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.