धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेने पिता-पुत्राचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 14:16 IST2020-11-30T14:14:21+5:302020-11-30T14:16:03+5:30
मुलाचा जागीच मृत्यू झाला तर वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेने पिता-पुत्राचा मृत्यू
पाथरी (जि.परभणी) : तालुक्यातील मरडसगाव येथून मोटरसायकलने जात असलेल्या पिता-पुत्राच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी माजलगाव- तेलगाव रस्त्यावर साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथील हरिभाऊ गीताराम काळे (३५) आणि त्यांचे वडील गीताराम काळे (५५) हे मोटारसायकलने धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील नातेवाईकांकडे मोटारसायकलने जात होते. माजलगाव- तेलगाव रस्त्यावर असलेल्या शिंदेवाडी फाट्याजवळ पाठीमागून येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.
या अपघातात हरिभाऊ काळे जागीच ठार झाले. त्यांचे वडील गीताराम काळे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलविले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूरला उपचारासाठी नेले जात असताना २९ नोव्हेंबर रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.