क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वेळी इराणच्याच आकाशात होतं विमान! शेतकरी अरुणा थोरेंचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 19:40 IST2026-03-04T19:39:31+5:302026-03-04T19:40:13+5:30

इराणच्या आकाशात थरार! परभणीच्या महिला शेतकऱ्याची युद्धाच्या आगीतून सुटका.

Selu Woman Farmer Survives Iran-Israel Missile Strike Zone During Europe Study Tour Flight | क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वेळी इराणच्याच आकाशात होतं विमान! शेतकरी अरुणा थोरेंचा थरारक अनुभव

क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वेळी इराणच्याच आकाशात होतं विमान! शेतकरी अरुणा थोरेंचा थरारक अनुभव

सेलू (जि. परभणी): "खाली अमेरिका आणि इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला होता आणि नेमक्या त्याच वेळी आमचे विमान इराण-इराकच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करत होते. शनिवारी सकाळी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतरच आम्ही खऱ्या अर्थाने सुटकेचा नि:श्वास सोडला," अशा शब्दांत सेलू येथील महिला शेतकरी अरुणा भुजंग थोरे यांनी आपला काळजाचा ठोका चुकवणारा अनुभव कथन केला.

युरोप दौरा आणि युद्धाचा प्रसंग
राज्य शासनाच्या शेती तंत्रज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी अरुणा थोरे यांची निवड झाली होती. स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँड असा प्रवास करून त्या २७ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता ॲमस्टरडॅम येथून एआय-१५६ विमानाने दिल्लीकडे निघाल्या. भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात बंदी असल्याने, त्यांचे विमान सिरिया, इराण आणि इराक या मध्यपूर्व आशियातील देशांवरून जात होते.

क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वेळी आकाशात!
शुक्रवारी रात्री (भारतीय वेळेनुसार रात्री १०:५०) जेव्हा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला झाला, तेव्हा अरुणा थोरे यांचे विमान नेमक्या त्याच हवाई क्षेत्रात होते. विमानातील प्रवाशांना युद्धाची नेमकी माहिती नसल्याने मोठा गोंधळ टळला, मात्र जमिनीवर सुरू असलेल्या युद्धाच्या छायेतून हे विमान दिल्लीला पोहोचले. "जर आमचा दौरा आणखी एक दिवस असता, तर आम्ही तिथेच अडकलो असतो," असे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

कुटुंबाची धाकधूक आणि सुखरूप पुनरागमन
युद्धाची बातमी कळताच अरुणा यांचे कुटुंब वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. शनिवारी दुपारी दिल्लीहून त्या मुंबई आणि पुणेमार्गे रविवारी रात्री सेलूत आपल्या घरी सुखरूप पोहोचल्या. शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करायला गेलेल्या या महिला शेतकऱ्यासाठी हा प्रवास कधीही न विसरता येणारा असा ठरला आहे.

Web Title: Selu Woman Farmer Survives Iran-Israel Missile Strike Zone During Europe Study Tour Flight