रजा आंदोलनामुळे महसूलचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 14:03 IST2020-10-01T14:03:08+5:302020-10-01T14:03:53+5:30
मराठवाड्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा देत गुरुवारी आंदोलन केले.

रजा आंदोलनामुळे महसूलचे कामकाज ठप्प
परभणी : मराठवाड्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा देत गुरुवारी आंदोलन केले.
राज्यातील औरंगाबाद विभागातील नियमित पदोन्नती आणि कालबद्ध पदोन्नतीचे प्रश्न रखडलेले आहेत. अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार आणि नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याची अनेक प्रकरणे दोन वर्षांपासून ठप्प आहेत. या कर्मचाऱ्यांना तातडीने पदोन्नती द्यावी, या प्रमुख मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार गुरुवारी महसूल कर्मचार्यांनी रजा देऊन आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील अनेक तहसीलदारही आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, महसूल प्रशासनातील २०० महसूल सहाय्यक, ९० अव्वल कारकून, ३५ नायब तहसीलदार आंदोलनात एकाच वेळी रजेवर गेले. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील महसूलचे कामकाज ठप्प झाले.