नात्याला काळिमा, नातजावयाकडून ८५ वर्षीय वृद्ध सासूवर अत्याचार, मारहाण करून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:39 IST2025-12-31T15:38:32+5:302025-12-31T15:39:46+5:30
लैंगिक अत्याचारानंतर जबर मारहाण; रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू

नात्याला काळिमा, नातजावयाकडून ८५ वर्षीय वृद्ध सासूवर अत्याचार, मारहाण करून खून
गंगाखेड (जि. परभणी) : नातजावयाने ८५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी महेबूबनगरात घडली. नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे.
पांडुरंग बालाजी गिरी असे आरोपीचे नाव आहे. मयत महिला नातीसोबत महेबूबनगर येथे राहात होत्या. फिर्यादीच्या बहिणीचा आणि तिचा नवरा पांडुरंग गिरी यांच्यामध्ये नेहमीच वाद होत होते. असाच वाद सोमवारीही झाला. त्यानंतर, पांडुरंगची पत्नी भयभीत होऊन मैत्रिणीकडे झोपण्यासाठी गेली. यादरम्यान, पांडुरंग गिरी याने मध्यरात्री वृध्द महिलेच्या घरी येऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर त्यांना जबर मारहाण केली. यात त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. यामध्ये महिलेचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले.
घटनेची माहिती मिळताच पोनि. श्रीकांत डोंगरे, सपोनि. शिवाजी शिंगणवाड, पोउपनि. व्यंकट गंगलवाड, सपोउपनि. शंकर रेंगे, संग्राम शिंदे, प्रदीप रणशूर, शिवाजी बोमशेटे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, गंगाखेड येथे विच्छेदनासाठी दाखल केला. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात पांडुरंग गिरी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पांडुरंग गिरी यास ताब्यात घेतले.