बहिणीला बिअर प्यायची का विचारल्याने राडा; लोखंडी रॉड डोक्यात घालून तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 16:10 IST2025-05-22T16:09:30+5:302025-05-22T16:10:11+5:30
परभणी तालुक्यातील झरी येथील घटना

बहिणीला बिअर प्यायची का विचारल्याने राडा; लोखंडी रॉड डोक्यात घालून तरुणाचा खून
झरी (जि. परभणी) : बहिणीला बिअर प्यायची का, विचारल्यावरून झालेल्या वादात लोखंडी रॉडने डोक्यावर मारून युवकाचा खून केल्याची घटना परभणी तालुक्यातील झरी गावामध्ये घडली. या प्रकरणी एकास ताब्यात घेत ग्रामीण ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
संतोष देवीदास मारकड (२९, रा. करंजी, ता. जिंतूर, ह.मु. गुंज, ता. माजलगाव) हा १६ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास झरी येथे ओळखीच्या दत्ता पावडे याच्या घरी आला होता. यावेळी त्याने पावडे याच्या बहिणीला बिअर प्यायची का, असे विचारले. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादात दत्ता पावडे याने लोखंडी रॉडने संतोष मारकडला मारहाण केली. त्यानंतर दोन दिवस परभणीच्या शासकीय रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर दोन दिवसांनी संतोष मारकड याचा मृत्यू झाला. यामध्ये आधी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. तपासानंतर पुढे हा गुन्हा नोंद झाला.
याप्रकरणी सालगडी कृष्णा पांडुरंग गडदे (हल्ली मु. गुंज) यांच्या तक्रारीनुसार दत्ता पावडे (रा. झरी) याच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम १०३ (१) बीएनएसप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितास पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी भेट दिली. तपास पोनि. डोंगरे करीत आहेत.