स्वबळावर सत्ता, आता विरोधकांची फौज! परभणी मनपात काँग्रेसला रोखणे हाच सर्वपक्षीय 'अजेंडा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:20 IST2025-12-16T13:19:46+5:302025-12-16T13:20:45+5:30
परभणी मनपात यंदा चुरस; पक्षांतरामुळे बदलले राजकीय समीकरण, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.

स्वबळावर सत्ता, आता विरोधकांची फौज! परभणी मनपात काँग्रेसला रोखणे हाच सर्वपक्षीय 'अजेंडा'
परभणी : मागच्या सभागृहात स्वबळावर सत्तेत असलेल्या काँग्रेससमोर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असून, महाविकास आघाडी अथवा महायुतीतील घटक पक्ष एकत्र येऊन लढतील, अशी चिन्हे कमीच आहेत.
परभणी मनपात मागच्या सभागृहात काँग्रेस ३१, राष्ट्रवादी १९, भाजप ८, शिवसेना ५, एमआयएम १ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल होते. एकूण ६५ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. महापौर पदासह इतर पदाधिकारी हे काँग्रेसचेच होते. मात्र, आता काँग्रेसच्या अनेकांनी पक्षांतर केले. राष्ट्रवादी व शिवसेनेचे दोन गट पडले. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपमध्ये मोठी इनकमिंग झाली. शहराची सामाजिक परिस्थिती ही कायम काँग्रेस व राष्ट्रवादीला पोषक राहिली आहे. त्यावर मात करायची तर या निवडणुकीत वेगळी रणनीती इतर सर्वांनाच आखावी लागणार आहे. तसे प्रयत्न होत असले तरीही ठरावीक भागात भाजप अथवा शिंदेसेनेला उमेदवार मिळविणे अवघड जाणार आहे. त्याचा त्यांना विचार करावा लागणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा शहरभर वारू दौडणार असला तरीही ते गणित जुळवणे गरजेचे आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय जाधव, आ. राहुल पाटील यांच्या मतदारसंघात ही मनपा येते. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मागच्या वेळी सेनेचे फारसे संख्याबळ नव्हते.
भाजपच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आ. सुरेश वरपूडकर, राष्ट्रवादीचे आ. राजेश विटेकर, राकाँ श. प. गटाच्या खा. फौजिया खान, माजी आ. विजय गव्हाणे ही मंडळी कामाला लागली आहे. काँग्रेसला रोखणे हाच सर्वांचा अजेंडा आहे. काँग्रेसजन हा हल्ला कसा परतवून लावतात, ते पाहणे रंजक ठरणार आहे.