कोळसा मालगाडीचे पावर इंजिन फेल, परभणी- परळी मार्गावर रेल्वे वाहतुकीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:44 IST2025-10-23T12:42:05+5:302025-10-23T12:44:14+5:30
पर्यायी इंजिन परभणी रेल्वे स्थानक येथून परळी मार्गावर मालगाडीला जोडण्यासाठी रवाना झाले आहे.

प्रतिकात्मक फोटो...
परभणी : परळीकडे जाणाऱ्या कोळसा वाहतुकीच्या मालगाडीचे इंजिन गंगाखेड ते वडगाव निळा दरम्यान फेल झाले. यामुळे परभणी परळी मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. हा प्रकार सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडला. पर्यायी इंजिन परभणी रेल्वे स्थानक येथून परळी मार्गावर मालगाडीला जोडण्यासाठी रवाना झाले आहे.
परभणी परळी मार्गावरील गंगाखेड ते परळी दरम्यान वडगाव निळा स्थानकाच्या परिसरात परळी कडे जाणाऱ्या कोळशाची वाहतूक करणाऱ्या मालगाडीचे इंजिन पावर फेल झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली. त्यामुळे परळी येथून परभणीकडे येणाऱ्या पनवेल नांदेड रेल्वेला वडगाव निळा स्थानकावर दोन तासापासून थांबविण्यात आले आहे. तर नांदेड बेंगलोर रेल्वे परभणी - गंगाखेड दरम्यान पोखरणी स्थानकावर थांबून ठेवली आहे. पूर्णा - हैदराबाद रेल्वे परभणी स्थानकावर तर गुंटूर- छत्रपती संभाजीनगर रेल्वे परळी स्थानकावर थांबविली आहे. सनासुदीच्या कालावधीत प्रवाशांचे मात्र गावाकडे परतताना वाहतूक प्रभावित झाल्याने गैरसोय झाली आहे.