पाथरी बाजार समितीत राजकीय उलथापालथ; दुर्राणींचा डाव यशस्वी, सभापतीवरील अविश्वास पारित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:25 IST2025-11-12T15:24:15+5:302025-11-12T15:25:10+5:30
ठराव बहुमताने पारित झाला आणि बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांना पायउतार व्हावे लागले.

पाथरी बाजार समितीत राजकीय उलथापालथ; दुर्राणींचा डाव यशस्वी, सभापतीवरील अविश्वास पारित
पाथरी : पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर पारित झाला असून, यामुळे तालुक्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी टाकलेल्या डावात अखेर त्यांना यश आले आहे.
यासाठी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष बैठक सहायक निबंधक एम.ए. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. १८ पैकी १३ संचालकांनी अविश्वासच्या बाजूने, तर ५ जणांनी विरोधात मतदान केले. त्यामुळे ठराव बहुमताने पारित झाला आणि नखाते यांना पायउतार व्हावे लागले.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे १८ पैकी १२, तर शिवसेनेचे सईद खान यांच्या गटाचे ६ संचालक निवडून आले होते. सभापतीपदी अनिल नखाते, तर उपसभापतीपदी श्याम धर्मे यांची निवड झाली होती. मात्र, त्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली. नखाते यांनी बाबाजानी यांना सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून बाजार समितीची राजकीय गणिते बिघडली होती. पुन्हा अचानक काँग्रेसचे सहा आणि शिंदेसेनेचे सहा संचालक एकत्र आले. त्यांनी नखातेंवर अविश्वास दाखल केला. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा यात पुढाकार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. या घडामोडीत शिवसेना संचालकांनी सईद खान यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याने अधिकच चर्चा रंगली होती.
दरम्यान, अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याने तणाव होता. त्यामुळे पोलिसांनी बाजार समिती प्रांगणात तगडा बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे आणि जवळपास १०० पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक सकाळीच घटनास्थळी दाखल झाले होते.
सहलीवरून थेट आगमन
सहलीवर गेलेले सर्व संचालक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता आपल्या वाहनांच्या ताफ्यासह बाजार समिती प्रांगणात दाखल झाले. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे ताफ्याच्या अग्रभागी होते.
शिंदे गटाच्या गळ्यात भगवा कायम
शिंदेसेनेचे सहा संचालक बैठकीसाठी येताना भगवे रुमाल गळ्यात परिधान करून आले होते. अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यावर काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व १३ संचालक एकत्र बाहेर पडून दुर्राणी यांच्या भेटीला गेले.
समीकरणे बदलणार?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडी घडल्याने तालुक्यातील राजकारणाचे समीकरण बिघडून गेले आहे. कोण कोणाच्या बाजूला राहील, याचा आता नेम नसल्याने सभापती निवडीपर्यंत आणखी काय उलथापालथ होते, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
शिवसेनेचा सभापती झाला तर काय फरक पडतो ?
बाजार समितीवर आपण सभापतिपदावर अनिल नखाते यांना बसविले. मात्र, ते आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सभापती झाले होते. आता मूळ शिवसेनेचा सभापती झाला तर आपल्याला काय फरक पडतो, अशी प्रतिक्रिया माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.