विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? परभणीत रिक्षा अपघातानंतर पालकांचा उद्रेक; शिक्षक-केंद्रप्रमुखांना घातला घेराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 12:42 IST2026-02-23T12:42:00+5:302026-02-23T12:42:27+5:30
शिष्यवृत्तीच्या परीक्षेला जाणारा ऑटो उलटला, संतप्त पालकांनी शिक्षकांसह केंद्र प्रमुखाला धरले धारेवर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? परभणीत रिक्षा अपघातानंतर पालकांचा उद्रेक; शिक्षक-केंद्रप्रमुखांना घातला घेराव
परभणी : शिष्यवृत्ती परीक्षेला घेऊन जाणारा विद्यार्थ्यांचा ऑटो उलटल्याची घटना रविवारी सकाळी पूर्णा तालुक्यातील कळगाववाडी पाटीजवळ घडली. यात धानोरा काळे जि.प. शाळेतील ५ विद्यार्थी गंभीर तर १० पेक्षा अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. या घटनेमुळे सोमवारी संतप्त पालक, ग्रामस्थांनी शाळेला टाळे लावून संताप व्यक्त केला. तसेच शिक्षकांसह केंद्र प्रमुखांना धारेवर धरत जाब विचारला. या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात रविवारी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली होती. पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील विद्यार्थी ताडकळस येथील परीक्षा केंद्रावर ऑटोने जात होते. यात १६ पेक्षा अधिक वि द्यार्थी प्रवास करत होते. दरम्यान काळगाववाडी पाटीजवळ येताच ऑटो उलटला. या अपघातात ५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर इतर विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाली. जखमींवर परभणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान सोमवारी सकाळीच संतप्त पालकांनी जिल्हा परिषद शाळेला टाळे लावले. शिक्षक नेहमीप्रमाणे शाळेत आले असता त्यांना धारेवर धरत जाब विचारला. तसेच केंद्रप्रमुखांनाही घेराव घालत जाब विचारला दरम्यान शाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.