पाथरी हादरले! बांदरवाडा शिवारात बिबट्याचा गोठ्यावर हल्ला; वासरू पळवून शेतात केले फस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:46 IST2026-01-13T19:44:51+5:302026-01-13T19:46:33+5:30
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास धजावत नाहीत.

पाथरी हादरले! बांदरवाडा शिवारात बिबट्याचा गोठ्यावर हल्ला; वासरू पळवून शेतात केले फस्त
- विठ्ठल भिसे
पाथरी (जि. परभणी): पाथरी तालुक्यातील बांदरवाडा शिवारात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मंगळवारी (१३ जानेवारी) पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका शेतकऱ्याच्या शेत आखाड्यावर हल्ला करून म्हशीचे वासरू पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास धजावत नाहीत.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बापूराव गायकवाड यांची बांदरवाडा शिवारातील गट क्रमांक ११४ मध्ये शेती आहे. त्यांनी आपल्या आखाड्यावर नेहमीप्रमाणे म्हशी आणि वासरू बांधले होते. मंगळवारी पहाटे बिबट्याने संधी साधून गोठ्यातील वासरू पळवून नेले. सकाळी सचिन गायकवाड जेव्हा दुचाकीवरून शेतात गेले, तेव्हा त्यांना हा प्रकार लक्षात आला. बिबट्याने हे वासरू शेजारील जिजाभाऊ साळवे यांच्या उसाच्या फडात ओढत नेऊन तिथे फस्त केल्याचे दिसून आले.
वन विभागाकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक अंकुश जाधव आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासणी दरम्यान परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आणि पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.