गंगाखेडजवळ ऑटोरिक्षा - बस अपघातात प्रवासी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 17:40 IST2019-04-22T17:38:44+5:302019-04-22T17:40:47+5:30
उपचारासाठी नांदेडला नेत असताना झाला मृत्यू

गंगाखेडजवळ ऑटोरिक्षा - बस अपघातात प्रवासी ठार
गंगाखेड (परभणी ) : ऑटोरिक्षा - बस अपघातात ऑटोमधील एकजण ठार झाला. ही घटना रविवारी ( दि. २१ ) रात्री ११ वाजेच्या सुमारास गंगाखेड-परभणी रस्त्यावरील साळापुरी पाटीजवळ घडली.
परभणी येथुन गंगाखेडकडे येणारी परभणी-गंगाखेड बस ( क्रमांक एमएच २० बीएल ३४९९ ) व गंगाखेड रस्त्याने परभणीकडे जाणारा ऑटोरिक्षा (एमएच २२ एफ ३१५४) यांची समोरासमोर धडक झाली. यात ऑटोरिक्षामधील सखाराम उर्फ बिभीषण लक्ष्मणराव सिरसाट (३५, रा. अमडापुर ता.जि.परभणी ) हे गंभीर जखमी झाले.
याचवेळी परभणी येथुन गंगाखेडकडे येणाऱ्या बुलढाणा-गंगाखेड बसचे चालक पदमाकर मुंडे व वाहक सुदर्शन कदम यांनी प्रवाशांच्या मदतीने सिरसाट यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती हेमंत मुंडे, परिचारिका संगिता लटपटे, राजेंद्र गायकवाड, गोविंद वडजे यांनी प्रथमोपचार केले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने रावण भालेराव यांच्या खाजगी रुग्णवाहिकेतुन त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.