परभणी: रक्कम वर्ग होऊनही गणवेश खरेदीला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:23 AM2019-07-09T00:23:17+5:302019-07-09T00:23:49+5:30

मोफत गणवेश खरेदीसाठी तालुक्यातील ७१ शाळांना १५ जून रोजी अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली. मात्र जुलैचा दुसरा आठवडा उजाडला तरी एकाही शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. त्यामुळे आणखी किमान महिनाभर विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Parbhani: Unlikely to buy uniforms even after being a student | परभणी: रक्कम वर्ग होऊनही गणवेश खरेदीला विलंब

परभणी: रक्कम वर्ग होऊनही गणवेश खरेदीला विलंब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : मोफत गणवेश खरेदीसाठी तालुक्यातील ७१ शाळांना १५ जून रोजी अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली. मात्र जुलैचा दुसरा आठवडा उजाडला तरी एकाही शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. त्यामुळे आणखी किमान महिनाभर विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत गणवेश दिला जातो. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्यांच्या गणवेशासाठी लागणारा निधी दिला जातो. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्या संयुक्त खात्यावर १५ जून रोजी वर्ग केला आहे.
तालुक्यातील ७१ शाळांतील ६ हजार २५० विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्यासाठी शासनाकडून ३७ लाख ८ हजार २०० रुपये एवढे अनुदान गट शिक्षण अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले होते. रक्कम प्राप्त झाल्यानंतर लगेचच शाळांना वर्ग करण्यात आली होती. या रकमेतून गणवेश खरेदी करुन लवकर वाटप होईल, असे वाटत होते. मात्र आणखी एकाही शाळेने गणवेश खरेदी करुन विद्यार्थ्यांना वाटप केले नसल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, मानवत तालुक्यातील शाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे; परंतु, विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत गणवेश मिळाला नाही. विशेष म्हणजे, गणवेशासाठी लागणारी रक्कमही संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे; परंतु, याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गतवर्षीही शाळेचे वर्ष संपेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश मिळाला नव्हता. त्यामुळे पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्यानेच गणवेश खरेदीसाठी विलंब लागत आहे. गणवेशाची रक्कम शाळा सुरू होण्यापूर्वी वर्ग केली असती तर शाळांना खरेदीचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असता.
त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन या शैक्षणिक वर्षात तरी वेळेवर गणवेश मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांची गणवेशासाठी हेळसांड
४शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०१७ मध्ये गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याची पद्धत अवलंबिली होती. मात्र बँक खाते उघडण्यापासून जमा झालेली रक्कम उचलण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला होता. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी गणवेशाची सर्व रक्कम खर्च होऊ शकली नव्हती. २०१८ मध्येही सुरुवातीला अशीच स्थिती होती. डेबिट प्रणाली प्रमाणे विद्यार्थ्यांच्या थेट खात्यावर रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नव्हता.
४यावर्षीपासून शाळा व्यवस्थापन समितीकडे रक्कम वर्ग करण्याची पद्धत अवलंबिण्यात येत आहे. यावर्षी तालुक्यातील ७१ शाळांतील जवळपास ६ हजार २५० विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन आहे. यासाठी ३७ लाखांचा निधीही वर्ग करण्यात आला होता. सामुदायिकरीत्या गणवेश खरेदीचा मार्ग सुकर झाल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांना लवकर गणवेश मिळेल, अशी अशा होती. मात्र जुलैचा दुसरा आठवडा उजडला तरी विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्याने विद्यार्थी साध्या कपड्यांत शाळेत हजेरी लावत आहेत.
मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीच्या खात्यावर गणवेशाचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. मात्र यावर्षी गणवेशामध्ये बदल झाल्याने उशीर होत आहे. लवकरच विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील.
-संजय ससाणे,
गटशिक्षणाधिकारी, मानवत

Web Title: Parbhani: Unlikely to buy uniforms even after being a student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.