परभणी : रोडे खून प्रकरणातील दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:38 IST2019-04-08T23:37:51+5:302019-04-08T23:38:30+5:30
शहरातील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

परभणी : रोडे खून प्रकरणातील दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
परभणी शहरातील जायकवाडी भागात ३१ मार्च रोजी शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी रवि गायकवाड व किरण डाके यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर राहत खुनाची कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी रवि गायकवाड याची पत्नी मीनाक्षी गायकवाड व सुभाष पवार या अन्य दोन आरोपींनाही अटक केली होती. आणखी दोन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वी मीनाक्षी गायकवाड हिला न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. त्यानंतर आरोपी रवि गायकवाड व किरण डाके यांची पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना परभणी येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली.