Parbhani: Three accused in murder case arrested | परभणी : खुनातील तीन आरोपी जेरबंद

परभणी : खुनातील तीन आरोपी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील बोबडे टाकळी येथे एकाचा धारदार शस्त्राने खून केल्या प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मुंबई, पुणे येथून जेरबंद केले़ या तिन्ही आरोपींना गुरुवारी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे़
याबाबत सविस्तर माहिती अशी, परभणी तालुक्यातील टाकळी बोबडे येथील ज्ञानोबा आस्वार यांचा ८ नोव्हेंबर रोजी धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता़ या प्रकरणी मयताची पत्नी रंजना ज्ञानोबा आस्वार हिने दिलेल्या फिर्यादीवरून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणात पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांचे पथक आरोपीच्या शोधार्थ मुंबई, पुणे येथे रवाना झाले़ या बाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईतील जोगेश्वरी व पुण्यातील आळंदी येथून मयताचा सावत्र भाऊ अमोल बापूराव आस्वार (२४, रा़ बोबडे टाकळी), नितीन किशन घायाळ (२६, रा़ केंदळी ता़ मंठा), बालासाहेब सखाराम माळवदे (३२, रा़ दिग्रस खु़ ता़ सेलू) या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले़ त्यानंतर या तिन्ही आरोपींना १४ नोव्हेंबर रोजी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले़
तोंडाला चिकटपट्टी लावून केले वार
४या प्रकरणात देण्यात आलेल्या फिर्यादीत, आरोपींनी ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री फिर्यादी रंजना आस्वार यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर त्यांचा पती ज्ञानोबा आस्वार यांना बाहेर ओढत नेवून धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर वार केले़
४तसेच त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले होते़ त्यामुळे हा खून कोणत्या उद्देशाने करण्यात आला? याचा तपास आता पोलीस करीत आहेत़

Web Title: Parbhani: Three accused in murder case arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.