परभणी : मनपा शिक्षकांचे पगार होईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:37 IST2018-09-11T00:36:55+5:302018-09-11T00:37:55+5:30
महापालिकेच्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचे पगार तब्बल १३ महिन्यांपासून रखडल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे़

परभणी : मनपा शिक्षकांचे पगार होईनात
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महापालिकेच्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचे पगार तब्बल १३ महिन्यांपासून रखडल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे़
परभणी शहरात महानगरपालिकेच्या अखत्यारित असणाºया प्राथमिक शाळा चालविल्या जातात़ या शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य करणाºया शिक्षकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे़ आॅगस्ट २०१७ ते आॅगस्ट २०१८ असे १३ महिन्यांचे वेतन थकले आहे़ विशेष म्हणजे शिक्षकांच्या पगारासाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान महापालिकेला प्राप्त होते़ परंतु, मनपाने ५० टक्के हिस्सा अदा न केल्याने पगार रखडले आहेत़
वारंवार मागणी करूनही शिक्षकांना पगार अदा केला जात नाही़ त्याच प्रमाणे मनपाच्या शिक्षण विभागासाठी सक्षम अधिकारी नियुक्त केलेला नाही़ लिपिकाचेही पद रिक्त आहे़ त्यामुळे शिक्षकांच्या समस्या वाढत चालल्या आहेत़ राज्य शासनाकडून महापालिकेला वस्तू व सेवा करांतर्गत १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ या निधीतून शिक्षकांचे पगार करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाने मनपा आयुक्तांकडे केली आहे़
शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात
वेतनाच्या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही उपयोग होत नसल्याने १३ आॅगस्ट रोजी शिक्षक संघाने उपोषणाचा इशारा दिला होता़ त्यावेळी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले; परंतु, त्यानंतरही वेतन झाले नाही़ त्यामुळे आता १८ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे़