परभणी :वडाळी येथे मंदिराची दानपेटी पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:54 IST2018-12-10T00:54:39+5:302018-12-10T00:54:59+5:30
तालुक्यातील वडाळी येथील जगदंबा देवी मंदिराची दानपेटी चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली असून, या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़

परभणी :वडाळी येथे मंदिराची दानपेटी पळविली
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : तालुक्यातील वडाळी येथील जगदंबा देवी मंदिराची दानपेटी चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली असून, या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़
वडाळी येथील काशीनाथ गणपती रोकडे हे जगदंबा देवीचे पुजारी आहेत़ ७ डिसेंबर रोजी वडाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागर शिक्षणाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता़ या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ शाळेच्या परिसरातच मंदिर असल्याने काशीनाथ रोकडे आणि आणखी एक जण रात्री २ वाजेपर्यंत मंदिरात जागे होते़ त्यानंतर दोघेही घरी गेले़ दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेच्या सुमारास काशीनाथ रोकडे हे साफसफाईसाठी मंदिरात आले तेव्हा दानपेटी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यांनी परिसरात दानपेटीचा शोध घेतला़; परंतु, ती मिळून आली नाही़ या प्रकरणी काशीनाथ रोकडे यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून, त्यावरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ दानपेटीमध्ये अंदाजे २५ हजारांची रक्कम असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे़