परभणीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशांत कच्छवा निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 16:51 IST2022-12-31T16:50:54+5:302022-12-31T16:51:37+5:30
सात वर्षांत केलेल्या कामाचीही सचिवांमार्फत चौकशी होणार

परभणीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशांत कच्छवा निलंबित
नागपूर /परभणी : जलसंधारण विभागात सलग सात वर्षे प्रतिनियुक्तीवर असलेले परभणीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशांत भगवानसिंह कच्छवा यांना आजच्या आज निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा प्रभारी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली तसेच त्यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामांची सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल, असेही जाहीर केले.
मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना सावंत यांनी ही घोषणा केली. सावंत यांनी सांगितले की, पी. बी. कच्छवा, सहायक अभियंता श्रेणी-१ यांची बदली लघुसिंचन उपविभाग परभणी येथे ३१ मे २०१६ राेजी करण्यात आली होती. ३१ मे २०१७ रोजी मृद व जलसंधारण या प्रशासकीय विभागांची निर्मिती झाली तरी कच्छवा हे त्याच पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांच्या कामाबाबत असमाधानकारक असा अहवाल दिला आहे तसेच लोकप्रतिनिधींकडूनही त्यांच्या अनेक तक्रारी आहेत. एकूणच या सर्व बाबी विचारात घेऊन ही कारवाई केली जात असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.