Parbhani: Road works worth Rs.5 crore | परभणी : पाच कोटी रुपयांतून होणार रस्त्यांची कामे
परभणी : पाच कोटी रुपयांतून होणार रस्त्यांची कामे

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगरविकास विभागाने परभणी महानगरपालिकेला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीतून १२ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
शहरातील रस्त्यांची वाहताहत झाली आहे. वसाहतीमधील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस झाल्यानंतर या भागात चिखल तुडवत घर गाठावे लागते. शहरातील बहुतांश रस्त्यांची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांचे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविले होते. या प्रस्तावाला नगरविकास विभागातील अव्वर सचिवांनी मंजुरी दिली असून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महानगरपालिकांना मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष अनुदान म्हणून २०१९-२० या वर्षासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. निश्चित केलेल्या कामांना तांत्रिक मान्यता देऊन ते प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्याच्या सूचना या आदेशात करण्यात आल्या आहेत.
मंजूर झालेल्या निधीमधून प्रभाग क्रमांक ९ मधील नानलपेठ ते पारदेश्वर मंदिरापर्यत डांबरीकरण करण्यासाठी ५० लाख रुपये, प्रभाग क्रमांक १५ खानापूर नगर ते पिंगळी रोड ते गावात जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ३० लाख रुपये, प्रभाग क्रमांक ४ मध्ये झाडगावकर यांच्या घरापासून ते वाघ किराणा दुकानापर्यंत रस्त्यचे डांबरीकरण व दोन्ही बाजुस नाली बांधकाम करण्यासाठी १ कोटी रुपये, प्रभाग क्रमांक ५ व्यंकटेश नगर येथे पाथरीकर यांचे घर ते डॉ.वाकुरे घरापर्यंत डांबरीकरण व दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम करण्यासाठी २० लाख रुपये, प्रभाग क्रमांक २ मल्हारनगर येथे पांडुरंग रेंगुळे यांच्या घरापासून ते सय्यद परवेज सय्यद आमेर यांच्या घरापर्यंत डांबरीकरण करण्यासाठी २५ लाख रुपये, प्रभाग क्रमांक १५ कारेगाव रोड ते गंगा एजन्सी गोडाऊन ते परदेशी यांचे घर, तसेच श्रीकृष्ण दत्तमंदिर पाटीपर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ५० लाख रुपये, प्रभाग क्रमांक ५ वसमत रोड ते उघडा महादेव मंदिरापर्यंत डांबरीकरणासाठी १ कोटी रुपये, प्रभाग क्रमांक १५ यावता चौक ते रेवलकर यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरणासाठी ४० लाख रुपये, प्रभाग क्रमांक १५ श्रीकृष्ण मंदिरापासून चोपडे यांच्या नर्सरीपर्यंत रस्ता डांबरीकरण ३० लाख रुपये, प्रभाग क्रमांक १० शांतीनगर दर्गा रोड पासून ते लोकरे यांच्या घरासमोर तसेच राठोड यांचे घर ते कुंभार यांच्या घरापर्यंतचा रस्ता ३० लाख रुपये आणि प्रभाग क्रमांक १० मधील चिद्रवारनगर रेंगे यांच्या घरापासून ते राजू मस्के यांच्या घरापर्यंत रस्त्यासाठी २५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून रस्त्यांची कामे हाती घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
लवकरच ही कामे सुरु होतील, अश्ी माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
प्रशासकीय मान्यतेनंतर : होणार कामे
४नगरविकास विभागाने मंजूर केलेल्या पाच कोटी रुपयांच्या या कामांना महानगरपालिकेने तांत्रिक मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे.
४जिल्हास्तरीय समितीची मान्यता मिळाल्यानंतर विभागीय आयुक्तांची प्रस्तावास मान्यता घेतली जाणार असून विभागीय आयुक्तांकडून पुढे मंत्रालय स्तरावर हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. मंत्रालयात मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
दलित वस्ती निधी
४महानगरपालिकेला १८-१९ या वर्षांसाठी १० कोटी रुपयांचा दलित वस्ती विकास निधी प्राप्त झाला असून, या निधीतून ६ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. उर्वरित कामांनाही प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असे मनपा प्रशासनाने सांगितले.


Web Title: Parbhani: Road works worth Rs.5 crore
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.