प्रवाशांच्या गैरसोयींचे परभणी रेल्वेस्टेशन ठरतेय ‘माॅडेल‘
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:23+5:302021-06-09T04:22:23+5:30
रेल्वे मंत्रालय तसेच केंद्राच्या रेल्वे अर्थसंकल्पात मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी परभणी रेल्वेस्थानकाचा समावेश मॉडेल स्थानकात करण्यात आला. त्यानुसार ...

प्रवाशांच्या गैरसोयींचे परभणी रेल्वेस्टेशन ठरतेय ‘माॅडेल‘
रेल्वे मंत्रालय तसेच केंद्राच्या रेल्वे अर्थसंकल्पात मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी परभणी रेल्वेस्थानकाचा समावेश मॉडेल स्थानकात करण्यात आला. त्यानुसार स्थानकाचे सुशोभीकरण तसेच प्रवाशांसाठी विविध सुविधा उभारण्याचे काम होती घेण्यात आले. यातील महत्त्वाची २ कामे पूर्ण होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला. त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवासी यांच्यासाठी लिफ्ट, इलेक्ट्रिक पायऱ्या (एस्केलेटर) बसविण्यात आले. परंतू, स्थानकातून प्रवेश केल्यावर हे अंतर लांब पडत असल्याने त्याचा वापर होत नसल्याचे दिसून येते. यामुळे ही साधने नेहमी बंद अवस्थेत असतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे. तसेच माॅडेल स्थानकात सांगितल्याप्रमाणे प्रवाशांसाठी प्लॅटफाॅर्मवर आसन व्यवस्था, विश्रामगृह आणि पिण्याचे पाणी, दुसरे प्रवेशद्वार तसेच नवीन आरक्षण खिडकी यांची काही कामे अजूनही पूर्णत्वास गेलेली नाहीत.
अर्धा किलोमीटरचा पायी फेरा
परभणी स्थानकावर सध्या तीन प्लॅटफाॅर्म आहेत. त्यामध्ये २ आणि ३ हे एकत्रत आहेत. नांदेडहून परळी, औरंगाबाद दिशेला जाणाऱ्या रेल्वे या ठिकाणी येतात तर प्लॅटफार्म १ वर औरंगाबाद येथून येणाऱ्या रेल्वे येतात. लिफ्ट किंवा एस्केलेटर जेथे बसविले ती जागा स्थानकात प्रवेश करणाऱ्या जागेपासून औरंगाबाद मार्गाकडे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे, परभणी रेल्वेस्थानकात २४ डब्याच्या ३ ते ४ रेल्वे येतात. ज्यात रेल्वेच्या थेट पाठीमागे आरक्षण असलेल्या एखाद्या प्रवाशाला जर लिफ्ट, एस्केलेटर वापरायचे झाल्यास त्यास पूर्ण प्लॅटफाॅर्मला पायी फेरा मारावा लागतो.
आरक्षण खिडकी जुन्याच तिकीटघरात
परभणी स्थानकात मागील २ वर्षांपूर्वी एक नवीन प्रवेशद्वार आणि आरक्षण खिडकी उभारण्यात आली त्याचा समावेश माॅडेल स्थानकात होता; परंतु, अजूनही या खिडकीचा वापर आरक्षण केंद्रासाठी करण्यात आलेला नाही. जुन्याच तिकीट घरातील आरक्षण खिडकीचा वापर अजूनही केला जात आहे.
नवीन दादरा उलट्या दिशेला
सध्या असलेला जुना दादरा अनेक वर्षांपूर्वींचा आहे. तो रूंदीला कमी असल्याने प्लॅटफाॅर्म १ ते ३ ला जोडण्यासाठी याच्या बाजूला सध्या नवीन दादऱ्याचे काम सुरू आहे. नवीन दादरा नांदेड दिशेला बांधल्या जात आहे. या दादऱ्याला एकाच बाजूने पायऱ्या केल्या जात आहेत. त्याही नांदेड दिशेला. ह्याच पायऱ्या प्लॅटफाॅर्म २, ३ वर परभणी स्थानकाच्या प्रवेशद्वार मार्गावर काढणे अपेक्षित आहे तसेच अजून प्लॅटफाॅर्म ४ बांधलाच गेला नाही तेथे मोकळ्या जागेत दादऱ्याच्या पायऱ्या काढल्या आहेत, हे विशेष.
जुना दादरा ढासळतोय
सध्या प्रवाशांची ये-जा करण्यासाठी जुना दादरा वापरला जातो. तो स्थानकाची इमारत बांधकाम झाली तेव्हापासून आहे. सध्या मागील सहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या दादऱ्याचा काही भाग पडला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच अजूनही काही भाग ढासळत आहे.