परभणी : बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे पोलिसांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:43 IST2019-01-05T00:42:18+5:302019-01-05T00:43:02+5:30
लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना परभणी येथील न्यायालयाने बुधवारी दिले आहेत.

परभणी : बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे पोलिसांना आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांनापरभणी येथील न्यायालयाने बुधवारी दिले आहेत.
याबाबत अॅड.सय्यद मुज्जमील हाश्मी यांनी दिलेली माहिती अशी- परभणी शहरातील आसेफनगर भागातील पीडित महिलेस अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील आरोपी चंद्रमोरे गंगाराम मोरे, कमळाबाई गंगाराम मोरे, रामा मोरे, राजू रामा मोरे यांनी आरोपी चंद्रमोरे मोरे याच्यासोबत लग्नाचे अमिष दाखविले.
आमचे परभणीत नातेवाईक आहेत, तेथे जावून लग्न करु, असे सांगून पीडितेला १७ जुलै २०१८ रोजी बाहेरगावहून परभणी येथे बोलावून घेतले व आसेफनगर भागातील एका घरामध्ये आरोपी चंद्रमोरे मोरे याने साथीदारांना कोर्ट मॅरेजचे कागदपत्र तयार करण्यासाठी बाहेर जाण्यास सांगितले व पीडित महिलेवर बलात्कार केला. सदरील महिला ओरडत असताना ही बाब कोणाला सांगितल्यास तुझ्या बरोबर लग्न करणार नाही, तुझी बदनामी करेल, तुझे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेल, अशी धमकी देऊन बळजबरीने सिंदी पाजून यौन शोषण केले. ३ आॅगस्ट २०१८ रोजी पीडित महिला आरोपीच्या तावडीतून सुटून न्यायालयात आली व अॅड.सय्यद मुज्जमील हाश्मी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पीडितेस कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले; परंतु, कोतवाली पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीडित महिलेने अॅड.स.मुज्जमील यांच्या मार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली पंडित यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी युक्तीवाद ऐकूण व कागदपत्राचे अवलोकन करुन न्या.वैशाली पंडित यांनी २ जानेवारी रोजी कोतवाली पोलिसांना या प्रकरणी गुन्हा नोंद करुन चौकशी करण्याचे आदेश दिले. पीडित महिलेच्या वतीने अॅड.सय्यद मुज्जमील हाश्मी यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.आसेफ पटेल यांनी सहकार्य केले.