मेलेला माणूस दंगल करायला कसा आला? 'FIR'मधील 'तो' घोळ उघड अन् नवरदेवाला जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 20:03 IST2026-02-25T20:03:27+5:302026-02-25T20:03:49+5:30
मृताच्या नावे गुन्हा अन् नवरदेवाच्या हाती बेड्या; बोरी दंगल प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

मेलेला माणूस दंगल करायला कसा आला? 'FIR'मधील 'तो' घोळ उघड अन् नवरदेवाला जामीन
जिंतूर (जि.परभणी) : एकीकडे लग्नाची लगबग आणि दुसरीकडे कारागृहातील बंदिवास अशा कात्रीत सापडलेल्या स्वप्निल संजय शिंपले या तरुणाला परभणी सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून, त्याची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. तर याच प्रकरणात चक्क मयत असलेल्या व्यक्तीचा एफआयआरमध्ये समावेश असल्याचा धक्कादायक प्रकारसुध्दा समोर आला आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे पुतळा स्थापनेप्रसंगी १९ फेब्रुवारीला रात्री ११ च्या सुमारास दंगल झाल्याचे नमूद करीत पोलिसांनी २० फेब्रुवारीला ४६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या एकूण १३ कलमांखाली बोरी ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. यात सरकारी कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यापासून ते दंगल घडवण्यासाठी गुन्हेगारी कट रचण्यापर्यंतचे गंभीर आरोप लावून पोलिसांनी आरोपींची नाकेबंदी केली होती. संशयित म्हणून स्वप्निल शिंपले या तरुणास २० फेब्रुवारीला दुपारी अटक करून त्याच दिवशी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती.
वकिलांनी केला जोरदार युक्तिवाद
त्यानंतर त्याने ॲड. सुनील बुधवंत यांच्यामार्फत जामिनासाठी परभणी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांनी न्यायालयासमोर धक्कादायक पुरावा सादर केला. ज्यात पोलिसांनी एफआयआरमध्ये ज्या आरोपी क्रमांक ४२ (लक्ष्मण माटे) याच्यावर दंगलीचे आणि हल्ल्याचे कलम लावले आहे, त्या व्यक्तीचे निधन १४ नोव्हेंबर २०१५ रोजीच झाले आहे. जो माणूस १० वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेला, तो दंगल करायला आणि पोलिसांवर हल्ला करायला प्रत्यक्ष हजर कसा असू शकतो?" असा मुद्दा मांडत त्यांनी दाखल एफआयआरमध्ये आरोपींची नावे ही यांत्रिकी आणि मनमानी पद्धतीने गोवल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच स्वप्निल शिंपले या तरुणाचा विवाह ५ मार्च रोजी होणार असून, लग्नघटिका जवळ असताना पोलिसांनी कोणत्याही ठोस पुराव्याविना केवळ संशयावरून स्वप्निलला अटक केली असून, ज्या तपासात पोलिसांना जिवंत आणि मृत व्यक्तीमधील फरक कळत नाही, त्या तपासाच्या आधारे एका नवरदेवाला तुरुंगात डांबणे हा त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर होत असलेला सामाजिक अन्याय आहे, असा मुद्दा संवेदनशीलपणे न्यायालयाला पटवून दिला.
या प्रकरणात सरकारी वकिलांनीसुद्धा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पोलिसांच्या एफ.आय.आर.मधील विसंगती पाहता, परभणी सत्र न्यायालयाने २४ फेब्रुवारीला स्वप्निल शिंपले याला जामीन मंजूर केला. ॲड. सुनील बुधवंत यांना या प्रकरणात ॲड. भगवान घुगे, ॲड. महेश वाघमारे यांनी सहकार्य केले.