परभणी : ‘एक मित्र, एक पुस्तक’ने उभारली चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:55 PM2019-04-15T23:55:59+5:302019-04-15T23:57:01+5:30

येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनने दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेला ‘एक मित्र एक पुस्तक’ हा उपक्रम आता चळवळीत रुपांतरित झाला असून, ४ हजार ग्रंथांची संपदा उभी राहिली आहे़ या ग्रंथांच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजविण्याचा मानस संकल्प फाऊंडेशनने व्यक्त केला आहे़

Parbhani: Movement started by 'a friend, a book' | परभणी : ‘एक मित्र, एक पुस्तक’ने उभारली चळवळ

परभणी : ‘एक मित्र, एक पुस्तक’ने उभारली चळवळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनने दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेला ‘एक मित्र एक पुस्तक’ हा उपक्रम आता चळवळीत रुपांतरित झाला असून, ४ हजार ग्रंथांची संपदा उभी राहिली आहे़ या ग्रंथांच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजविण्याचा मानस संकल्प फाऊंडेशनने व्यक्त केला आहे़
सामाजिक क्षेत्रात पुढे येऊन काम करण्याचा ध्यास घेत दोन वर्षापूर्वी संकल्प फाऊंडेशनचे बिजारोपण करण्यात आले़ या माध्यमातून सामाजिक भान असलेल्या मित्रांनी एकत्र येऊन कामाला सुरुवात केली़ सुरुवातीच्या काळात छोटे स्वरुप असलेल्या या फाऊंडेशनला आता व्यापक स्वरुप मिळाले आहे़ गोरगरीब कुटूंबियांना मदत करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना मोफत ग्रंथ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने दोन महिन्यांपूर्वी एक मित्र एक पुस्तक हा उपक्रम सुरू करण्यात आला़
पाहता पाहता या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला़ कृषी, महापुरुषांचे चरित्र, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, बालसाहित्य, मराठी, इंग्रजी शब्दकोष, संत साहित्य अशी साहित्यातील विविध प्रकारांची पुस्तके जमा होवू लागली़ सुमारे ४ हजार पुस्तकांचा साठा या फाऊंडेशनने केला असून, ही पुस्तके सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत़
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल रोजी तालुक्यातील उजाळंबा येथे म़ बसवेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले़
यावेळी समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्राचार्य नितीन लोहट, फाऊंडेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर निरस, सचिव विलास साखरे, सहसचिव मारोती जुंबडे, उपाध्यक्ष प्रा़ सुभाष ढगे, डॉ़ ओमप्रकाश वारकरे, दिनकर जोशी, सतीश शिंदे, संतोष शिंदे, नामदेव शिंदे, रामप्रसाद आवचार, राजू वाघ, बालाजी वाघ, विठ्ठल डोळसे, लांडगे यांची उपस्थिती होती़ दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा़ आपल्याकडील पुस्तके वाचनालयासाठी द्यावीत, असे आवाहन अध्यक्ष आणि सचिवांनी केले आहे़
१७० कुटूंबियांना मदत
४या फाऊंडेशनने आतापर्यंत १७० कुटूंबियांना मदत देऊ केली आहे़ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबिय, निराधार महिलांना त्यांचे कुटूंब पुन्हा उभे राहण्यास मदत होईल, या दृष्टीने संसारोपयोगी साहित्य, व्यावसायासाठी साहित्य वाटप करण्यात आले़ दसरा, दिवाळी, ईद आणि महापुरुषांच्या जयंतीदिनी विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन फाऊंडेशनने वेगळी ओळख निर्माण केली आहे़

Web Title: Parbhani: Movement started by 'a friend, a book'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.