परभणी : दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्व पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:11 AM2019-09-22T00:11:02+5:302019-09-22T00:11:43+5:30

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्व या निवडणुकीत पणाला लागले असून, पुन्हा विधानसभा गाठण्याच्या इराद्याने विद्यमान आमदारांनी जोरदार तयारी चालविली आहे़ दुसरीकडे नवीन उमेदवारही राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी सरसावले आहेत़

Parbhani: Legendary leaders have a political existence | परभणी : दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्व पणाला

परभणी : दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्व पणाला

Next

अभिमन्यू कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्व या निवडणुकीत पणाला लागले असून, पुन्हा विधानसभा गाठण्याच्या इराद्याने विद्यमान आमदारांनी जोरदार तयारी चालविली आहे़ दुसरीकडे नवीन उमेदवारही राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी सरसावले आहेत़
परभणी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून, यावेळेसही येथून आ़ डॉ़ राहुल पाटील दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत़ गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना खा बंडू जाधव यांची साथ लाभली होती; परंतु, त्यानंतरच्या काळात त्यांच्यात मतभेद झाले़ आजही हे मतभेद कायम आहेत़ त्यांच्यातील वाद मिटविण्याची तसदी अद्यापही पक्षश्रेष्ठींनी घेतलेली नाही़ दुसरीकडे आघाडीत काँगेसच्या वाट्याला परभणी मतदारसंघ आला असताना आघाडीचा उमेदवार कोण, हे अद्यापही ठरलेले नाही़ प्रारंभी तब्बल १६ जण इच्छुक असलेल्या या पक्षातील अनेकांनी निवडणूक लागण्यापूर्वीच माघार घेतली़ आता माजी खा़ तुकाराम रेंगे, रविराज देशमुख आणि सुरेश नागरे हे तिघे इच्छुक राहिले आहेत़ त्यात नागरे यांना काँग्रेसच्या सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे़ शिवाय त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशही केलेला नाही़ त्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाची निवड करतील, हे अनिश्चित आहे़ वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार येथे निश्चित नाही़
जिंतूरमधून राष्ट्रवादीचे आ़ विजय भांबळे हे चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत़ यावेळी त्यांच्यासमोर भाजपाकडून माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांचे आव्हान असणार आहे़ दोन्ही नेत्यांनी येथून जोरदार तयारी चालविली आहे़ येथे वंचित आघाडीकडून मनोहर वावळे हे तयारी करीत आहेत़ शिवाय अन्यही काही इच्छुक या मतदारसंघातून आहेत़ माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर हे अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच स्वत: निवडणुकीत नसले तरी त्यांच्या कन्या मेघना यांना राजकारणात यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत़
गंगाखेड मतदारसंघात आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे पुन्हा तिसºयांदा राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरत आहेत़ माजी आ़ सीताराम घनदाट हेही या निवडणुकीत पुन्हा उतरणार असले तरी त्यांचा पक्ष निश्चित नाही़ राष्ट्रवादी, रासपकडून उमेदवारी मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु, त्यात त्यांना यश आले नाही़ त्यामुळे ते अपक्षच मैदानात उतरू शकतात़ रासपचे प्रदेश उपाध्यक्ष रत्नाकर गुट्टे हे तुरूंगात असल्याने त्यांच्या निवडणूक लढविण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे़ संतोष मुरकुटे हे रासपकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत़ वंचित आघाडीनेही येथून उमेदवार देण्याची तयारी चालविली आहे़
पाथरी विधानसभा मतदारसंघात युतीतच मोठी टक्कर होण्याची शक्यता आहे़ आ़ मोहन फड हे अपक्ष निवडून आल्यानंतर शिवसेनेत गेले़ तेथून भाजपात गेले़ लोकसभा निवडणुकीत त्यांनी खा़ बंडू जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा प्रचार केला़ त्यामुळे मतदारसंघातील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते संतापले आहेत़ आ़ फड यांना या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग खा़ जाधव समर्थकांनी बांधला आहे़ शिवाय सोनपेठ येथील भाजपाच्या पदाधिकाºयांनी आ़ फड यांच्या भूमिकेला विरोध केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे़ भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे़ काँग्रेसकडून येथून माजी मंत्री सुरेश वरपूडकर हे उमेदवार राहण्याची शक्यता आहे़ तशी पाच वर्षांपासून त्यांनी तयारी केली आहे़ त्यांना अदृश्य हातांची मदत होऊ शकते़ वंचित आघाडीकडून सुनील बावळे हे उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत़
गेल्या निवडणुकीत आ़ फड यांना निवडून आणण्यासाठी बावळे यांनी बरीच मेहनत घेतली होती; परंतु, आ़ फड व त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने फड यांना पराभूत करण्यासाठी बावळे यांची यंत्रणा कामाला लागली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांचे राजकीय अस्तित्व या निवडणुकीत पणाला लागले आहे़
निवडणुकीत बंडू जाधव यांची महत्त्वाची भूमिका
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा़ बंडू जाधव यांनी भल्या भल्यांचे अंदाज चुकवत विजय मिळविला होता़ त्यावेळी खा़ जाधव हे एकाकी लढले होते़ आता या निवडणुकीत ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत़ परभणीत आ़ डॉ़ राहुल पाटील तर पाथरीमध्ये आ़ मोहन फड यांच्याशी त्यांचे मतभेद कायम आहेत़ त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात ते कोणती भूमिका घेतात? हा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे़ जिंतूरमध्ये माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्याशी त्यांची राजकीय मैत्री जगजाहीर आहे़ लोकसभा निवडणुकीतून मेघना बोर्डीकर यांनी खा़ जाधव यांच्यासाठी माघार घेतली होती़ त्याची परतफेड खा़ जाधव हे या निवडणुकीत करू शकतात़ गंगाखेडमध्ये युतीचा उमेदवार कोण आहे? हे निश्चित नाही़ त्यामुळे येथे सद्यस्थितीत त्यांची वेट अँड वॉचची भूमिका आहे़
नोटाला ६ हजार ९३५ मते
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ४ मतदार संघात नोटाला ६ हजार ९३५ मते पडली होती़ त्यात सर्वाधिक म्हणजे २ हजार ७० मते परभणी मतदारसंघात पडली होती़
बाबाजानी दुर्राणी- राजेश विटेकर
या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी आणि माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर यांची पाथरी मतदार संघात गोची होण्याची शक्यता आहे़ लोकसभा निवडणुकीत विटेकर यांच्यासाठी भाजपाचे आ़ मोहन फड यांनी युतीचा धर्म बाजुला सारून प्रचार केला़ यासाठी आ़ दुर्राणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली़ विधानसभेला पाथरीची जागा काँग्रेसकडे आहे़ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परभणीच्या दौºयात आघाडीच्या उमेदवारांसाठी काम करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार विटेकर व दुर्राणी यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांचा प्रचार करावा की लोकसभेला मदत केलेले भाजपाचे आ़ मोहन फड यांचा प्रचार करावा, असा पेच निर्माण झाला आहे़
नशीबवान अन कमनशिबी
गंगाखेड विधानसभा मतदार संघातून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ़ मधुसूदन केंद्रे नशिबवान ठरले़ त्यांनी फक्त २ हजार २८९ मतांनी विजय मिळविला़ दुसºया क्रमांकावरील रासपचे रत्नाकर गुट्टे हे कमनशिबी ठरले़ शिवसेनेचे शिवाजी दळणर यांनी तब्बल ४१ हजार ९१५ मते मिळवित गुट्टे यांच्या विजयातील अंतर वाढविले़ त्याचा फायदा केंद्रेंना झाला़
‘वंचित’चे काय ?
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने निवडणुका लढविण्याची तयारी केली आहे; परंतु, जिल्हास्तरावर चर्चेतील चेहरा अद्यापही वंचितकडे नाही़ शिवाय चार मतदारसंघातील उमेदवार कोण असतील हे गुलदस्त्यात आहे़ यामुळे ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांत उत्सुकता निर्माण झाली आहे़

Web Title: Parbhani: Legendary leaders have a political existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.