परभणी:सिंचनाचे पाणी तोडून खळी ग्रामस्थांची भागविली जातेय तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:26 IST2019-04-21T00:26:33+5:302019-04-21T00:26:43+5:30
खळी गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येथील रामेश्वर पवार या शेतकऱ्याने पिकाचे पाणी तोडून ग्रामस्थांसाठी हे पाणी उपलब्ध करून दिले आहे़

परभणी:सिंचनाचे पाणी तोडून खळी ग्रामस्थांची भागविली जातेय तहान
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : खळी गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येथील रामेश्वर पवार या शेतकऱ्याने पिकाचे पाणी तोडून ग्रामस्थांसाठी हे पाणी उपलब्ध करून दिले आहे़
तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वच गावांमध्ये सतावत आहे़ शहरापासून काही अंतरावर असलेल्या गोदावरी नदीकाठावरील खळी गावातही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ विशेष म्हणजे नदीपात्र जवळच असतानाही ग्रामस्थांची ही भटकंती सुरू आहे़
नदीपात्रात पाणी शिल्लक नाही़ भूजल पातळी घटल्याने गावातील विहीर, बोअर आटले आहेत़ त्यामुळे खळी ग्रामस्थांना पाणी पुरवठा योजनेच्या लिकेजवरून पाणी भरावे लागते़ ही अवस्था पाहून येथील शेतकरी रमेशराव माधवराव पवार यांनी शेतातील विहिरीचे पाणी गावकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे़ या विहिरीच्या पाण्यावर उन्हाळी पिके घेण्याचे नियोजन त्यांनी केले होते; परंतु, गावात निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन पिकांना पाणी न देता ते पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले आहे़ शेतातील विहिरीवर गावापासून एक ते दीड किमी अंतरापर्यंत पाईपलाईन करून त्या ठिकाणी पाणी आणून सोडले आहे़ त्यामुळे मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे़ दररोज या ठिकाणी पाणी भरण्यासाठी गर्दी होत आहे़ या पाण्याच्या माध्यमातून खळी गावातील जवळपास ४० कुटूंबांना पाणी उपलब्ध झले आहे़ या कुटुंबियांची तहान भागविण्याचे काम रमेशराव पवार यांनी केले आहे़
खळी गावासाठी पाणी पुरवठा योजनाही उपलब्ध आहे़ गोदावरी नदीपात्रात या योजनेसाठी विहीर घेण्यात आली आहे़ मात्र या विहिरीलाही पाणी नसल्याने पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीत कुचकामी ठरली आहे़ गावातील टंचाई परिस्थितीत पवार यांनी केलेल्या उपाययोजनेमुळे टंचाईपासून दिलासा मिळाला आहे़
पाण्यासाठी सालगड्याचे सहकार्य
रमेशराव पवार यांच्या शेतातील विहीर जुनी आणि खोल आहे़ या विहिरीतूनही काही ग्रामस्थ पाणी नेतात़ त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी या ठिकाणी सालगड्याची व्यवस्था केली असून, सालगड्याच्या माध्यमातून विहिरीचे पाणी गावकºयांना उपलब्ध करून दिले जात आहे़