Parbhani: Increased irritation for water | परभणी: पाण्यासाठी वाढली व्याकुळता
परभणी: पाण्यासाठी वाढली व्याकुळता

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात एक पाणीपाळी सोडण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
जिल्ह्यात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दुष्काळाचा प्रश्न काहीसा अडगळीत पडला होता. आता निवडणुका संपल्यानंतर दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष देण्याची अपेक्षा सर्वसामान्यांमधून होत आहे. जायकवाडी प्रकल्पातून यापूर्वी दोनवेळा पाणी पाळी सोडण्यात आल्या; परंतु, त्यासाठीचे नियोजन केले गेले नसल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. जायकवाडीच्या पट्यात जिल्ह्यातील १८० गावांचा समावेश आहे.
या घडीला गोदावरील काठावरील गावेही पाण्यासाठी तहानलेली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तशी मागणीही जायकवाडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे; परंतु, त्याकडे अद्याप लक्ष देण्यात आले नाही. सद्यस्थितीत जायकवाडी प्रकल्पात ६९५.८९९ दलघमी मृतसाठा आहे. यातील १०० दलघमी पाणी कालव्याऐवजी गोदावरी नदीपात्रात सोडले तर हा प्रश्न सुटू शकतो.
पाण्याच्या मागणीसाठी १० एप्रिल रोजी किसान सभेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता; परंतु, त्यानंतरही प्रशासनाचा निर्णय झालेला नाही. अशीच काहीशी स्थिती निम्न दुधना प्रकल्प क्षेत्रात येणाºया गावांची झालेली आहे. दुधना प्रकल्पात सद्यस्थितीत ९०.१०० दलघमी मृत पाणीसाठा आहे. या प्रकल्पातूनही नदीपात्रात पाणी सोडल्यास त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी व चाºयासाठी फायदा होऊ शकतो; परंतु, संबंधित प्रशासनाची तशी मानसिकता दिसत नाही. परिणामी ग्रामस्थांची पाण्यासाठी व्याकुळता वाढली आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातून तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील १० तलाव पडले कोरडेठाक
जिल्ह्यातील ६ लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी ढालेगाव बंधाºयात १.५ दलघमी तर डिग्रस बंधाºयात १३ दलघमी जीवंत पाणीसाठा आहे. उर्वरित करपरा बंधाºयात ३.८३ दलघमी मृतपाणीसाठा असून मासोळी प्रकल्पात ३.९१ तर मुद्गल बंधाºयात ०.५१ आणि मुळी बंधाºयात ०.७४ दलघमी मृतपाणीसाठा आहे. या शिवाय जिल्ह्यातील २४ लघु तलावांपैकी १३ तलावांमध्ये अल्प मृतपाणीसाठा आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यातील पेडगाव, पाथरी तालुक्यातील झरी, सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी, पालम तालुक्यातील तांदुळवाडी, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, टाकळवाडी, कोद्री, पिंपळदरी तलाव, जिंतूर तालुक्यातील वडाळी, चारठाणा, केहाळ, कवडा व मांडवी या तलावांचा समावेश आहे. उर्वरित गंगाखेड तालुक्यातील दगडवाडी, डोंगरपिंपळा, भेंडेवाडी, जिंतूर तालुक्यातील देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, ंिचंचोली, आडगाव, भोसी आणि दहेगाव येथील तलावातील पाणीसाठा संपल्याने हे तलाव कोरडे पडले आहेत. परिणामी या भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामध्ये नागरिक कसे तरी पाणी मिळवित असताना मुक्या जनावरांचे मात्र पाण्यासाठी हाल होत आहेत. विशेषत: वन्य प्राण्यांची मोठी आभाळ होत आहे.
निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये जवळपास १ हजार कृषीपंप बसविण्यात आले असून त्याद्वारे पाण्याचा उपसा करुन ते सिंचनासाठी वापरले जात असल्याच्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
प्रमुख प्रकल्पातील जलसाठा
पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या जायकवाडी प्रकल्पात सद्यस्थितीत ६९५.८९९ दलघमी मृत पाणीसाठा आहे. तसेच निम्न दुधना प्रकल्पात ९०.१०० दलघमी मृतसाठा शिल्लक असून येलदरी प्रकल्पामध्ये १००.५७९ दलघमी मृतपाणीसाठा आहे. सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये १६१.४५५ दलघमी मृत पाणीसाठा आहे. या चारही मोठ्या प्रकल्पांमध्ये जिवंत पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे मृतसाठ्यातूनच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन घ्यावे लागत आहे.

जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्याला सिंचनासाठी मिळणाºया पाण्यात ४२० दलघमीची कपात करण्यात आली. १२ सप्टेंबर २०१८ रोजी पाणी वाटपाचे फेर नियोजन करुन दुष्काळात होरपळणाºया शेतकºयांना पाणी उपलब्ध करुन देण्याऐवजी बिअर कंपन्यांसाठी पाणी देण्यात आले. ही या विभागाची कचखाऊ व दुजाभाव करणारी व कचखाऊ भूमिका आहे. जिल्ह्यातील १६५ गावांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे पाणी वाटपाचे फेरनियोजन रद्द करुन तातडीने एक पाणीपाळी जायकवाडीतून जिल्ह्याला द्यावी. अन्यथा किसान सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- विलास बाबर,
जिल्हा सरचिटणीस, किसान सभा

जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात येणाºया गावांमध्ये सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या घशाची कोरड थांबविण्यासाठी व मुक्या जनावरांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी एक पाणीपाळी सोडणे अत्यंत आवश्यक आहे. या बाबत मागणी करुनही या विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत. शनिवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाने याबाबत दखल न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याला सर्वस्वी हा विभाग जबाबदार राहील.
- आ.डॉ.राहुल पाटील, परभणी


Web Title: Parbhani: Increased irritation for water
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.