परभणी : गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:37 IST2019-09-21T00:23:12+5:302019-09-21T00:37:01+5:30
पोलिसांनी शहरात जप्त केलेल्या १८ लाख रुपयांच्या गुटख्या प्रकरणी घरमालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी : गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : पोलिसांनी शहरात जप्त केलेल्या १८ लाख रुपयांच्या गुटख्या प्रकरणी घरमालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे यांच्या पथकाने बाबुशा गवते यांच्या घरावर धाड टाकली. या धाडीमध्ये आरएमडी, गोवा, राजनिवास व विमल गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छवे यांनी २० सप्टेंबर रोजी जप्त केलेल्या गुटख्याचा पंचनामा करुन मोजणी केली असता १८ लाख ६ हजार ७०० रुपयांचा गुटखा असल्याचे निष्पन्न झाले.
प्रकाश कच्छवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुटखा विक्रेते निखील हिरामन तमखाने (रा.तमखाने गल्ली, गंगाखेड), अमोल सुभाष बडवणे (रा.देवळे जिनिंग गंगाखेड) व घरमालक बाबुशा गवते (रा.तमखाने गल्ली) या तिघांविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके हे करीत आहेत.
झोला येथे युवकाचा मृत्यू
४गंगाखेड- अति दारु सेवण केल्याने ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील झोला येथे घडली. तालुक्यातील झोला येथील महेश दत्तात्रय ढाकणे (३०) या युवकाने अति दारु सेवण केल्याने तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्यास गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
४यावेळी उपस्थित डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी २० सप्टेंबर रोजी मयत महेश ढाकणे यांचे वडील दत्तात्रय मुगाजी ढाकणे यांनी दिलेल्या माहितीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार सुरेश पाटील हे करीत आहेत.
सोनपेठ शहरात दोन दुकाने फोडली
४सोनपेठ- शहरातील परळी रस्त्यावरील दोन दुकानांचे शटर वाकवून चोरी केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. शहरातील परळी रस्त्यावरील इनामदार कॉलनी येथील राजेभाऊ कराड हे १९ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन घरी गेले. त्यानंतर २० सप्टेंबर रोजी शेजारील व्यक्तीच्या लक्षात ही घटना आल्यानंतर दुकानाचे शटर वाकवून चोरी झाल्याचे दुकानमालक कराड यांना सांगितले.
४त्यानंतर पाहणी केली असता दुकानातील १५ हजार ५०० रोख व किराणा सामान असा २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे, अशी फिर्याद राजेभाऊ कराड यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार अनिल शिंदे हे करीत आहेत.