परभणी : गोदामपाल कांबळे निलंबित; तहसीलदारांना दिली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:24 IST2019-01-12T00:24:44+5:302019-01-12T00:24:51+5:30
पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या ३३ लाख ७५ हजार ३०८ रुपयांच्या १२१८ क्विंटल धान्य घोटाळा प्रकरणात गोदामपाल एस.पी.कांबळे यांना निलंबित करण्यात आले असून प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

परभणी : गोदामपाल कांबळे निलंबित; तहसीलदारांना दिली नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या ३३ लाख ७५ हजार ३०८ रुपयांच्या १२१८ क्विंटल धान्य घोटाळा प्रकरणात गोदामपाल एस.पी.कांबळे यांना निलंबित करण्यात आले असून प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामाची गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी विश्वंभर गावंडे यांनी तपासणी केली असता त्यामध्ये १२६२.४१ क्विंटल धान्य कमी आढळून आले होते. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी प्रभारी तहसीलदार तथा पुरवठा निरिक्षक श्रीरंग कदम यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुन्हा एकदा गोदामातील धान्याची पडताळणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ७०८.३९ क्विंटल गहू, ५०९.१८ किलो तांदुळ, १.१५ क्विंटल तूर दाळ व ०.२४ किलो चनाडाळ असे एकूण १२१८ क्विंटल धान्य कमी आढळून आले होते. पुरवठा विभागाने निश्चित केलेल्या दरानुसार या धान्याची ३३ लाख ७५ हजार ३०८ रुपये किंमत होते.
या किंमतीच्या रक्कमेच्या धान्याचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी शुक्रवारीच गोदामपाल एस.पी.कांबळे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. तर प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
गोदामपाल कांबळे यांच्याकडून अनेक दिवसांपासून गोदामातील धान्याचा अपहार टप्प्याटप्प्याने होत असताना या गोदामाची नियमित तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे यासाठी कारणीभूत असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांनाही निलंबित करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.