Parbhani: Generates electricity of 3 lakhs in 3 days | परभणी : ४ दिवसांत १६ लाखांची वीज निर्मिती
परभणी : ४ दिवसांत १६ लाखांची वीज निर्मिती

प्रशांत मुळी।
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी : निम्म्या पावसाळ्यात ज्या येलदरी धरणातील पाणीसाठ्याने तीन जिल्ह्यांची चिंता वाढविली होती. त्याच येलदरी प्रकल्पात १५ दिवसांमध्ये झालेल्या विक्रमी पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न तर निकाली निघालाच. शिवाय चार दिवसांमध्ये येथील जलविद्युत केंद्राने राज्याच्या वीजसाठ्यात १५ लाख ७२ हजार रुपयांच्या विजेची भर घातली आहे.
येलदरी येथील येलदरी प्रकल्पाच्या माध्यमातून परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील प्रमुख शहरांची तहान भागविली जाते. याशिवाय सुमारे ६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प तिन्ही जिल्ह्यांसाठी वरदान ठरणारा आहे. विशेष म्हणजे याच प्रकल्पावर राज्यातील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला. महावितरणांतर्गत हा प्रकल्प चालविला जातो. येलदरी प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी सोडल्यानंतर हा प्रकल्प सुरु होतो आणि सिंचनाबरोबरच वीज निर्मितीचे कार्यही या माध्यमातून होते.
मागील दोन वर्षांपासून येलदरी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा नसल्याने जलविद्युत निर्मिती बंद होती. मागील वर्षी तर हा प्रकल्प मृतसाठ्यात गेल्याने नागरिकांच्या पाण्याच्या समस्या चिंतेची बाब ठरल्या. यावर्षीच्या पावसाळ्यातही निम्मा पाऊस सरला तरी या प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नसल्याने संभाव्य पाणीटंचाईमुळे चिंता वाढल्या होत्या. मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला.
बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी येलदरी प्रकल्पात दाखल झाले आणि अवघ्या काही दिवसांतच या प्रकल्पात ९६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्नही निकाली निघाला आहे.
येलदरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरु असून पूर नियंत्रण करण्याच्या उद्देशाने ४ नोव्हेंबर रोजी या प्रकल्पातून प्रति तास ६ दलघमी पाणी जलविद्युत केंद्रातून नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे ४ नोव्हेंबर रोजी या प्रकल्पाचे दोन संच कार्यान्वित होऊन वीज निर्मिती सुरु झाली. ५ नोव्हेंबर रोजी प्रकल्पातील तिसरा संचही सुरु करण्यात आला. त्यामुळे जल विद्युत केंद्रातून आता पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती केली जात आहे.
मागील सहा दिवसांमध्ये या प्रकल्पातून ५ लाख २४ हजार युनिट वीज तयार करण्यात आली आहे. ही वीज राज्याच्या विजेच्या साठ्यामध्ये भर घालणारी ठरली आहे. सहा वर्षानंतर प्रथमच येलदरी येथील वीज निर्मिती प्रकल्पामधून विजेची निर्मिती सुरु झाली आहे.
१९६८ मध्ये प्रकल्पाची उभारणी
४येलदरी येथे १९६८ मध्ये राज्यात सर्व प्रथम जल विद्युत निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आला. तेव्हापासून आजतागायत हा प्रकल्प एकदाही दुरुस्तीविना सुरु आहे. या प्रकल्पात ७.५ मेगावॅटचे तीन संच आहेत.
४या तिन्ही संचाच्या माध्यमातून २२.५ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. सध्या येलदरी प्रकल्पातून २४ तासांना ६ दलघमी पाणी सोडले जात असून त्या माध्यमातून वीज निर्मिती केली जात आहे.
३ रुपये युनिट प्रमाणे विक्री
४येलदरी येथील जलविद्युत केंद्रात तयार झालेली वीज महापारेषण कंपनीला विक्री केली जाते. विजेचे बाजारमूल्य ३ रुपये प्रति युनिट असून या दराने आतापर्यंत १५ लाख ७२ हजार रुपयांची वीज निर्मिती या प्रकल्पातून झाली आहे.
४मागील सहा वर्षापासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला नाही. त्यामुळे वीज निर्मिती केंद्राला नुकसान सहन करावे लागले. मात्र यावर्षी धरणात ९६ टक्के पाणीसाठा झाल्याने पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती प्रकल्प सुरु झाला आहे, अशी माहिती महानिर्मितीचे कार्यकारी अभियंता तेजेंद्र चौधरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी.एम.डांगे यांनी दिली.
निम्म्या कर्मचाऱ्यांवरच चालते काम
४येलदरी येथील वीज निर्मिती प्रकल्पासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकूण ५६ पदे मंजूर आहेत; परंतु, केवळ २६ अधिकारी- कर्मचाºयांवरच येथील कारभार चालविला जात आहे. त्यामध्ये कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि तंत्रज्ञ कर्मचाºयांचा समावेश आहे.

Web Title: Parbhani: Generates electricity of 3 lakhs in 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.