शक्तिपीठ महामार्गास जमिनी देणार नाही; आम्हाला पोलिस बंदोबस्त द्या; शेतकऱ्यांचा विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:54 IST2026-02-18T11:53:34+5:302026-02-18T11:54:16+5:30

प्रशासकीय नोटीस आली अन् गावं पेटून उठली! 'या' १२ गावांत अधिकारी पाऊल ठेवू शकतील का? वाचा शक्तीपीठ विरोधाचा ग्राऊंड रिपोर्ट

Parbhani Farmers Oppose Shaktipeeth Highway; Seek Police Protection Against Forced Land Survey | शक्तिपीठ महामार्गास जमिनी देणार नाही; आम्हाला पोलिस बंदोबस्त द्या; शेतकऱ्यांचा विरोध कायम

शक्तिपीठ महामार्गास जमिनी देणार नाही; आम्हाला पोलिस बंदोबस्त द्या; शेतकऱ्यांचा विरोध कायम

परभणी : शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारकडून आमच्या जमिनी हिसकावल्या जाण्याची भीती आहे. काही जिल्ह्यांत हा प्रकार घडत आहे. आमच्यासोबतही हा प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यासाठी पोलिस अधीक्षंकाकडे शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

विविध प्रकल्पांत जमिनी गेल्याने आधीच अनेक शेतकरी देशोधडीला लागले. आता पुन्हा शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी, टाकळगव्हाण, लोहगाव, सहजपूर (ज.), ताडपांगरी, आंबेटाकळी, पोखर्णी (नृ.), दैठणा, साळापुरी आदी गावांतील शेतकऱ्यांना पुन्हा जमीन मोजणीसाठी नोटिसा आल्या आहेत. त्यामुळे भूमिअभिलेख व महसूलचे अधिकारी या गावांत जाणार आहेत. ते बळजबरीने जमीन मोजणी करून अधिग्रहण करतील, अशी शेतकऱ्यांना भीती आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असून आम्हाला पोलिस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर सतीश घाटगे, वैभव गरूड, बाबूराव गरूड, महादेव चांगभले, ज्ञानेश्वर बल्लाळ, माणिक बल्लाळ, मुंजाजी कोंडिबा इचनर, दत्तराव नळदकर, पंडित धुसळे, बाबाराव खंडागळे, शिवदत्त अवचार, गोविंद घाटोळ, विजय बेले, ए. एम. शिंदे अशा शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

...तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ
शक्तिपीठ महामार्ग हा रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाला समांतर असून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी अनेकदा मोर्चे, आंदोलने केली असून हा महामार्ग न थांबल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार असल्याचे निवेदनात म्हटले.

पुन्हा सुरू होणार मोजणी
१८ फेब्रुवारीपासून पुन्हा शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी सुरू होणार असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रशासनाने मोजणीला येऊच नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. आता यामध्ये नेमके काय घडणार? हे कळायला मार्ग नाही.

Web Title : शक्तिपीठ राजमार्ग के लिए भूमि अधिग्रहण का किसानों का विरोध, पुलिस सुरक्षा की मांग

Web Summary : परभणी के किसानों को शक्तिपीठ राजमार्ग के लिए जबरन भूमि अधिग्रहण का डर है। उन्होंने भूमि सर्वेक्षण के दौरान पुलिस सुरक्षा का अनुरोध किया, संभावित अशांति का हवाला देते हुए और परियोजना के आगे बढ़ने पर आत्महत्या की धमकी दी। 18 फरवरी से माप फिर से शुरू।

Web Title : Farmers Resist Land Acquisition for Shaktipeeth Highway, Demand Police Protection

Web Summary : Parbhani farmers fear forced land acquisition for the Shaktipeeth Highway. They request police protection during land surveys, citing potential unrest and threatening suicides if the project proceeds. Measurement restarts February 18th.