सुसाईड नोट ठरली महत्त्वाची! नर्सिंग विद्यार्थिनीला जीवन संपविण्यास भाग पाडणाऱ्यास पाच वर्षांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 19:32 IST2026-03-09T19:32:39+5:302026-03-09T19:32:55+5:30
नर्सिंग विद्यार्थिनीला मरण्यास भाग पाडणाऱ्या नराधमाला परभणी न्यायालयाने दिली शिक्षा सुसाईड नोटने मिळवून दिला न्याय! दिव्या आठवले प्रकरणातील आरोपीला जेल.

सुसाईड नोट ठरली महत्त्वाची! नर्सिंग विद्यार्थिनीला जीवन संपविण्यास भाग पाडणाऱ्यास पाच वर्षांचा कारावास
परभणी : नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीसोबत प्रेम करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा प्रेमभंग केला. संबंधित परिचारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश -१ एन.आर.नाईकवाडे यांनी सोमवारी निकाल दिला. परिचारिकेचा प्रेमभंग करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका आरोपीस पाच वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
राजू उर्फ अनिल महादेव ढगे (२६, रा.करंजी, ता. मानवत) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. मानवत पोलिस ठाण्यात शोभा आठवले यांनी २५ मे २०२१ रोजी फिर्याद दिली होती. फिर्यादी यांची मुलगी दिव्या आठवले ही नर्सिंगचे शिक्षण घेत होती. आरोपीने दिव्या आठवले यांच्यासोबत प्रेम करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा प्रेमभंग केला. त्यामुळे तिने २० मे २०२१ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यापूर्वी तिने आरोपीने तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली व त्यात आरोपीने वारंवार तिला मानसिक त्रास दिल्यामुळे आत्महत्या केल्याचे नमूद केले होते. दाखल गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी केला. मयताची सुसाईड नोट व तिचे दुसरी लिखित वही ही हस्ताक्षर तज्ञाकडे पाठविण्यात आली. हे प्रकरण जिल्हा न्यायाधीश -१ एन.आर.नाईकवाडे यांच्यासमोर चालले. यामध्ये सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता आनंद गिराम यांनी बाजू मांडली. त्यात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. संशयापलीकडे जाऊन आरोपीने मयतास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे सिद्ध झाले. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर सोमवारी जिल्हा न्यायाधीश -१ एन.आर.नाईकवाडे यांनी निकाल दिला.
आरोपी राजू उर्फ अनिल महादेव ढगे यास भादवी कलम ३०६ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद गिराम यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी अधिकारी सुरेश चव्हाण, सय्यद रहिम, वंदना आदोडे, प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.