परभणी रिक्षाचालक हत्याकांड: 'जुन्या वादातून कायमचे संपवलं', मारेकरीही निघाला रिक्षाचालकच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:45 IST2026-02-17T12:45:12+5:302026-02-17T12:45:29+5:30
परभणी पोलिसांचा 'सुपरफास्ट' तपास! रिक्षाचालकाच्या मारेकऱ्याला अवघ्या ४८ तासांत ठोकल्या बेड्या

परभणी रिक्षाचालक हत्याकांड: 'जुन्या वादातून कायमचे संपवलं', मारेकरीही निघाला रिक्षाचालकच
परभणी : शहरातील नांदखेडा रोड भागात शनिवारी दुपारी झालेला ऑटोचालकाचा खून हा एका ऑटोचालकाने जुन्या वादाच्या कारणावरून केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील आरोपी ऑटोचालकास सोमवारी स्थानिक गुन्हा शाखा, नानलपेठ पोलिस पथकाने पाथरी रोड भागातून ताब्यात घेतले.
सय्यद अकबर ऊर्फ बब्बू सय्यद गफार (४५) या ऑटोचालकाचा धारदार शस्त्राने गळा कापून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी मृताचा भाऊ सय्यद आसेफ सय्यद गफार यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आरोपी शोधासाठी आठ पथके तयार केली होती.
सोमवारी आरोपीचा सुगावा लागला. पाथरी रोड भागातून ऑटोचालक सिद्धार्थ सेनापती नंद (२७, रा. गंगाखेड रोड, परभणी) यास ताब्यात घेतले. सिद्धार्थ नंद याने मृताचा जुन्या वादाच्या कारणावरून गळा कापून खून केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीचा ४८ तासांच्या आत शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात आला. आरोपीस न्यायालयासमोर सोमवारी हजर केले असता न्यायालयाने त्यास २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल करत आहेत.
ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखा पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलिस निरीक्षक गणेश कदम, सचिन बेंद्रे, सपोनि. सुधाकर खजे, जगताप, जटाळ, बिक्कड, बुधोडकर, चंदन परिहार, सोडगीर, लिंगायत, मुरकुटे, संतोष सानप, निलेश कांबळे, शोहेब पठाण यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.